या प्रदर्शनात सादर होणाऱ्या सर्वच वस्तू प्राचीन आणि दुर्मिळ वर्गात मोडत असल्या तरीही इराकने नाशिकच्या नोटप्रेसमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात छपाई केलेल्या या नोटेचे ऐतिहासिक मूल्य हे चलनातील मूल्यापलीकडचे आहे. आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक मूल्य असणारी ही नोट अविष्कार नरसिंगे या अभियांत्रिकीच्या तरुणाकडे असून, त्याने ती नाशिककरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.
…म्हणून नाशिक नोट प्रेसमध्ये छपाई
अविष्कारच्या संग्रहात ही नोट येऊन वर्ष झाले आहे. इराक आधी ब्रिटनकडून नोटा छापून घेत असे. मात्र, दुसरे महायुद्धावेळी आणीबाणीच्या स्थितीत ब्रिटनकडून नोटा छापून घेण्यास विलंब झाला असता. परिणामी, देशात चलनाचा तुटवडा निर्माण झाला असता. त्यामुळे पर्याय म्हणून भारतातील नाशिकमधील सिक्युरिटी प्रेसमधून ‘एक दिनार’ हे चलन छापण्याचा निर्णय तत्कालीन इजिप्तच्या सत्ताधाऱ्यांनी घेतला. अतिशय अल्पकाळ या नोटा नाशिकमध्ये छापल्या गेल्या. यानंतर अत्यल्प कालावधीसाठी त्या इराकमध्ये चलनात राहिल्या. त्यानंतर सन १९४२ मध्ये तेथे चलनात नव्या नोटा उतरविल्याच्या नोंदी असल्याचे नरसिंगे यांनी सांगितले.
नोटेचे नाव ‘बेबी इश्यू’
इराकमध्ये सन १९४१ मध्ये चालविली गेलेली ‘एक दिनार’ चलनातील ही नोट ‘बेबी इश्यू’ म्हणून ओळखली जाते. त्यावेळी नाशिकमधून अर्धा दिनार, एक दिनार, एक चतुर्थांश (क्वार्टर) दिनार आणि हंड्रेड फिल्स अशा चार सीरिजची छपाई झाली होती. यापैकी ‘हंड्रेड फिल्स’ सीरिजचा नमुना आज उपलब्ध असला तरी मूळ नोट ऐकिवात राहिली आहे. नाशिकमध्ये छापलेल्या एक दिनार नोटेवर सहा वर्षांचे बालक किंग फैसल दुसरा याचे पोर्ट्रेट आहे. त्याच्याकडे वयाच्या तिसऱ्या वर्षी इराकचे सिंहासन आले होते. १४ जुलै १९५८ च्या क्रांतीत फैसल दुसरा याच्या मृत्यूपर्यंत त्याने तब्बल २३ वर्षे राज्य केले होते. या सीरिजमधील नोट उपलब्ध होणे संग्राहकांमध्ये दुर्मिळ उदाहरण मानले जाते.