आज अशाच एका देशसेवेचे व्रत स्विकारलेल्या उमेदवाराविषयी सांगणार आहोत. ज्याने २८ लाख रुपये अशा मोठ्या पगाराची नोकरी आणि सुखवाहू, आरामदायी नोकरी सोडून तो नागरी सेवेत रुजू झाले. आम्ही सांगतोय दिल्लीतील रहिवासी आयुष गोयल, ज्याने एवढं मोठं पाऊल उचलल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण होऊन एका बड्या पदावर रुजू झाला.
आयएएस अधिकारी आयुष गोयल यांनी त्यांचे औपचारिक शालेय शिक्षण दिल्लीतील सरकार संचालित राजकिया प्रतिभा विकास विद्यालयामधून पूर्ण केले. आयुषला दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९१.२ टक्के गुण मिळाले होते. तर १२ वी बोर्डाच्या परीक्षेत त्याने ९६.२ टक्के गुण मिळवले. १२ वी नंतर आयुषने दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी प्राप्त केली.
यानंतर, आयुषने कॅट परीक्षेची तयारी सुरू केली. कॅट परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्याने केरळमधील आयआयएम कोझिकोड येथे एमबीएसाठी प्रवेश घेतला. आयुषच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार (Ayush Goel – Indian Administrative Service (IAS), एमबीए पूर्ण केल्यानंतर, आयुषने जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीमध्ये विश्लेषक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यापदावर काम करण्यासाठी त्याला वर्षाला २८ लाखांचे पॅकेजवर देण्यात येत होते.
आयुषचे वडील सुभाष चंद्र गोयल यांचे किराणा मालाचे दुकान आहे, तर आई मीरा गोयल गृहिणी आहेत. आयुषला त्याच्या अभ्यासासाठी २० लाखांचे कर्ज घ्यावे लागले होते. त्याचवेळी आयुषला नोकरी लागल्यावर त्याच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला होता, पण आपल्या मुलाने यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या आनंदाला तडा गेला.
नोकरीवर रुजू झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांमध्ये आयुषने नोकरी सोडली. त्याला आपले संपूर्ण लक्ष यूपीएससी नागरी सेवा परीक्षेवर केंद्रित करायचे होते. एवढी चांगली पगाराची नोकरी सोडल्यानंतर त्याच्यावर अभ्यासाचे खूप दडपण होते. त्यामुळे, यूपीएससी परीक्षेसाठी तो रात्रंदिवस अभ्यास करत असे.
आयुषने यूपीएससीसाठी दीड वर्ष घरीच अभ्यास केला. यासाठी त्याने कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. इंटरनेटवर व्हिडिओ पाहून, पुस्तके वाचून तो दररोज आठ ते दहा तास सतत अभ्यास करत असे. त्याचा परिणाम असा झाला की तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. इतक्या लवकर तो आपले ध्येय गाठेल याची त्याला कल्पनाही नव्हती. मात्र, त्याची तयारी अशी होती की या परीक्षेत तो १७१ व्या क्रमांकाने यशस्वी झाला आणि आयएएस अधिकारी झाला.