मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील व्यस्त सुतारदरा येथील त्याच्या राहत्या घराजवळ दुपारी १.२० च्या सुमारास मोहोळवर गोळीबार झाला. त्यावेळी गोळीबार करणारा मुन्ना पोळेकर इतर जणांसह मोटारसायकलवरुन तिथे पोहोचला आणि त्याने मोहोळवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ ठोकला. या घटनेनंतर उपस्थितांमध्ये घबराट पसरली. गोळी लागल्याने ४० वर्षीय मोहोळ हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. उपस्थित स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला स्थानिक रुग्णालयात सह्याद्री येथे दाखल करण्यात आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, रुग्णालयात त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मोहोळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मोहोळचे समर्थक रुग्णालयात जमले होते. त्यामुळे पोलिसांना रुग्णालय आणि परिसरात कडक बंदोबस्त ठेवावा लागला.
ड्रायव्हर एक कुख्यात गँगस्टर कसा बनला?
शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती यांनी एप्रिल २०२३ मध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मोहोळ दाम्पत्य शहरातील विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नियमितपणे दिसत होते. मोहोळ याच्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यात डझनाहून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याने ९ वर्षे तुरुंगात घालवली, काही प्रकरणांमध्ये जामीन मिळवला आणि एकेकाळी त्याला पुणे जिल्ह्यातून हद्दपारही करण्यात आले होते.
शरद मोहोळ हा कुख्यात माफिया संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ होता, त्याची ऑक्टोबर २००७ मध्ये पुण्यातील रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गणेश मारणे टोळीने ही हत्या केली होती. शरद हा संदीपसाठी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. जेव्हा संदीपची हत्या झाली तेव्हा शरद हा गाडी चालवत होता. तेव्हाच शरदने मारणे टोळीला संपवणार असल्याची शपथ घेतली होती. त्यानंतर २०१० ला मोहोळने गणेश मारणे टोळीचा म्होरक्या किशोर मारणेला निलायम टॉकीजजवळ संपवलं होतं. संदीपच्या मृत्यूनंतर शरदने अंडरवर्ल्डच्या जगात प्रवेश केला होता.
Read Latest Maharashtra News And Marathi News