हायलाइट्स:
- गणेशोत्सवावरील निर्बंधांबाबत अजित पवार यांचं महत्त्वाचं विधान
- गणेशोत्सवावर नव्यानं निर्बंध लादले जाणार नाहीत
- केंद्र सरकारच्या सूचनेमुळं मंदिरं बंद – अजित पवार
पुणे: करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सण-उत्सवांना पूर्ण मुभा देण्याच्या तयारीत नाही. दहीहंडी उत्सव साजरा करण्यासही राज्य सरकारनं स्पष्ट शब्दांत मनाई केली होती. त्यामुळं गणेशोत्सवावर सरकार नेमके काय निर्बंध लावणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. (Ajit Pawar on Ganpati Festival)
पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘आगामी गणेशोत्सवामध्ये नवीन निर्बंध लावले जाणार नाहीत. मात्र, पहिल्या दिवशी होणारी गर्दी पाहून निर्बंध लावायचे की नाहीत, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल,’ असं अजित पवार यांनी सांगितलं. ‘यंदाचा गणेशोत्सव नागरिकांनी साधेपणानं साजरा करावा. घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत. त्या निर्णयाची अंमलबजावणी सर्व गणेशभक्तांनी करावी, असंही ते म्हणाले.
हेही वाचा:
‘करोना गेला’ असं समजून वागणाऱ्यांना अजित पवारांचा कडक शब्दांत इशारा
‘स्टिंग ऑपरेशन करणं काँगेस नेत्याच्या अंगलट; विनयभंगाचा गुन्हा दाखल
‘मंदिरं सुरू करण्यासाठी विरोधी पक्षांकडून आंदोलन केलं जात आहे. राज्य सरकारचीही तीच भूमिका आहे. मात्र, केंद्र सरकारनं सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळं मंदिरं उघडू शकत नाही. भाजपनं आंदोलन करताना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं काय सूचना दिल्या आहेत, ते पहावं,’ असा टोला अजित पवार यांनी हाणला. जलतरण तलाव सुरू केले जाणार नाहीत
महापालिका निवडणुकांचा निर्णय आज?
आगामी महापालिका निवडणुकांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आज सायंकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुका आणि किती सदस्यांचा प्रभाग करायचा याबाबत चर्चा होईल. त्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असं ते म्हणाले. ‘पुणे महापालिकेत कोणत्याही विकासकामांबाबत आणि निर्णयांसंदर्भात पक्षाच्या शहराध्यक्षांकडून घेतली जाणारी भूमिका ही पक्षाची भूमिका आहे,’ असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.