हिंगोली जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीला खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे यांचीही उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव हे अधिकारीही उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रत्यक्ष स्वरूपात घेण्याचे ठरलेले असताना पालकमंत्री सत्तार यांनी अचानकपणे आपला प्रवास दौरा रद्द करत ही बैठक ऑनलाईन घेण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. बैठकीच्या सुरूवातीलाच निधी वाटपातील भेदभावावरून खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक रूप धारण करून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधातील आपला इरादा स्पष्ट केला.
राज्यात इतके जिल्हे असताना हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यात येवून निधीवाटपात शेण खाणं योग्य नाही, असं खासदार हेमंत पाटील म्हणाले. यावरून पालकमंत्री सत्तारही संतापले. दरम्यान, मंत्रीमहोदय आणि खासदारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. निधीवाटप जर असंच सुरू राहिलं तर शिवसैनिक तुम्हाला पायाखाली घेतील, असा इशाराच पाटील यांनी दिला. त्यावर सत्तारही तावातावाने बोलू लागले.
पालकमंत्री सत्तार आणि खासदार पाटील दोघांनीही असंवैधानिक शब्दाचा वापर केला असल्याचे या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. दोघांमधील वाद बघून या बैठकीतील अधिकारी आणि सदस्यांची भंबेरी उडाली. पालकमंत्र्यांनी आमदारांना बोलण्यासाठी विचारले असताना उपस्थित आमदारांनी ऑनलाईन मीटिंगमध्ये काहीच ऐकू येत नसल्याचे सांगितले.
या घडलेल्या प्रकाराची प्रशासकीय व राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे. खासदार हेमंत पाटील यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.