शिवसेनेची तोफ धडाडणार; नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत २३ जानेवारीला जाहीर सभा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. अनंत कान्हेरे मैदानावर होणारी ही सभा जगदंबेचा जागर करीत केली जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. शनिवारी (दि. ६) राऊत यांनी कान्हेरे मैदानाची पाहणी केली त्यानंतर आयोजित बैठकीत माध्यमांशी संवाद साधला. आगामी निवडणुका म्हणजे शिवसेना ठाकरे गटाची कसोटीच असून, निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राऊत म्हणाले, २३ जानेवारी रोजी सकाळी १० ते २ या वेळेत डेमोक्रसी कल्ब येथे पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांचे एकदिवशीय शिबिर होईल. तर सायंकाळी ६ वाजता कान्हेरे मैदानावर शिवसैनिकांचे खुले अधिवेशन होईल. या अधिवेशनात उद्धव ठाकरे संबोधित करतील. लोकसभा निवडणुका येऊ घातल्या असून, त्याचे रणशिंगही या सभेतून फुंकले जाईल. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे २२ जानेवारीला सायंकाळी नाशिकमध्ये दाखल होतील. सायंकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर गोदातीरावरील महाआरतीत सहभागी होतील, असे राऊत यांनी सांगितले.

दार उघड बाई दार……

लोकसभेच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे २३ रोजी नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. यात ‘दार उघड बाई दार’…चा जयघोष करीत जगदंबेचा गोंधळ घातला जाणार आहे. १९८४ मध्ये देखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकच्या याच मैदानावर जगदंबेचा आशीर्वाद मिळवीत जाहीर सभेला संबोधित केले होते. आता पुनश्च एकदा जगदंबेची आराधना या मैदनावरून केली जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

लोकसभेसाठी मुद्देच मुद्दे

‘महागाई वाढते आहे, भ्रष्टाचार, महिला-मुलांवर अत्याचार वाढताहेत, लोकांना जगणं मुश्किल झालं आहे. कष्टकरी, शेतकरी हवालदिल झालाय. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जातायत. एकीकडे अवकाळीची भरपाई दिली जात नाही तर दुसरीकडे कांद्याची निर्याद बंदी केली जाते. हे कमी म्हणून की काय ईडी केंद्राचे नोकर म्हणून काम करते आहे. देशातील हुकुमशाही राजवट थांबवायची असेल तर आघाडीसोबत येण्याच्या उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे लोकसभेसाठी मुद्द्यांची कमतरता नाही, असे राऊत म्हणाले.
२२ जानेवारीला राम मंदिर उद्घाटनास अयोध्येला जाणार का? उद्धव ठाकरे यांनी सांगितला प्लॅन
अयोध्येचा सोहळा लोकसभेसाठी

अयोध्येतील राम मंदिराचे काम अर्धवट आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे एखादी वास्तू पूर्ण झाल्याशिवाय आपण तेथे राहायला जात नाही अथवा देवाची मूर्ती बसवित नाही. हे अनेक महंतांनी सांगितले आहे. मात्र, लोकसभेपूर्वी हा सोहळा केला जात आहे. आता रामचंद्रांनीच त्यांना सद्‌बुद्धी द्यावी, असेही राऊत म्हणाले. आयोध्येला का जाणार नाही? या प्रश्नावर राऊत म्हणाले,‘आयोध्येला राम मंदिर व्हावं, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आहे. यापूर्वी आम्ही तेथे गेलो आहोत आणि यापुढेही जाऊ. त्यामुळे आताच तेथे जावे असे काही नाही. श्रीराम आयोध्येत असणारच आहेत. जेव्हा कधी श्रीराम आज्ञा करतील तेव्हा उद्धव ठाकरे आयोध्येला नक्की जातील.

माँ साहेबांना अभिवादन

माँ साहेब मीनाताई ठाकरे म्हणजे प्रेरणा, प्रेम आणि आपुलकीच्या प्रतिक होत्या. तमाम शिवसैनिकांना त्यांनी लेकरासारखे वागविले आणि म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्व खुलून दिसते, असे प्रतिपादन शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी केले. माँ साहेबांची ९३ वी जयंती शिवसेनेच्या शालिमार येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

Source link

aditya thackerayAnant Kanhere Maidanmaharashtra loksabha electionsmaharashtra political crisisSanjay Rautshivsena newsuddhav thackeray groupUddhav Thackeray news
Comments (0)
Add Comment