काय आहे प्रकरण?
-अविनाश मुरकुटे (वय ३३, रा. भीम चौक, इंदोरा), त्याची पत्नी किरण मुरकुटे (वय २७), स्वप्नील ऊर्फ पंकज सफेलकर (वय ३२, रा. हिलटॉप) व रवींद्र नवघरे (वय ३८, रा. सुदामनगरी, नरसाळा) अशी अटकेतील आरोपींची नावे असून, अमित लोणारे व वसुंधरा समुपदेशन केंद्रात कार्यरत अज्ञात अधिकारी फरार आहे.
-हे युगूल यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. २६वर्षीय तरुणी शेअर मार्केटिंगचे काम करीत असून तिचा प्रियकर बँकेत व्यवस्थापक आहे.
-प्रेमसंबंध असताना दोघेही मार्च २०२२मध्ये कामाच्या शोधात नागपुरात आले, ‘लिव्ह इन’मध्ये राहायला लागले. त्यांनी नंदनवन परिसरात भाड्याने खोलीही घेतली.
-दरम्यान, डिसेंबरमध्ये तरुणी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. धंतोलीत एका हॉस्पिटलमध्ये ती गर्भपात करण्यासाठी गेली. येथील डॉक्टरांनी तिला गर्भपात करण्यास नकार दिला.
-त्यानंतर चार दिवसांनी बँकेत काम करणारा सहकारी रवींद्र नवघरे हा युगुलाच्या घरी आला. ‘तुझे लग्न झाले नाही, तू तरुणीसोबत कसा राहतो’, अशी विचारणा रवींद्रने तरुणीच्या प्रियकराला केली. त्याने तरुणी गर्भवती असल्याचे सांगितले.
-‘तू बलात्काराच्या गुन्ह्यात कारागृहात जाऊ शकतो’, असा धमकीवजा इशारा रवींद्रने त्याला दिला. ‘अविनाश मुरकुटे माझे मित्र आहेत. त्यांना अपत्य नाही. तुला होणारे बाळ ते घेतील. तुमची बदनामीही होणार नाही’, असे रवींद्रने युगुलाला सांगितले.
-त्यानंतर मुरकुटे दाम्पत्य युगुलाला घरी घेऊन गेले. २१ मार्चला तरुणीने मुलाला जन्म दिला. प्रसूतीदरम्यान मुरकुटे दाम्पत्य संपूर्ण वेळ हॉस्पिटलमध्येच राहिले.
-हॉस्पिटलमधून सुटी होताच मुरकुटे दाम्पत्याने मुलाला स्वत:कडे ठेवले. युगुलाला मुलास भेटण्यास मनाई केली. मुलगा परत हवा असल्यास चार लाखांची मागणी केली.
-त्यानंतर मुरकुटेचा मेहुणा अमित व कुख्यात रणजित सफेलकरचा नातेवाईक स्वप्नीलने युगुलाला पिस्तूलचा धाक दाखवून धमकवायला सुरुवात केली. युगुलाला बळजबरीने नोटरी कार्यालयात नेले. तेथेही पिस्तुलाच्या धाकावर त्यांची दस्तऐवजांवर स्वाक्षरी घेतली.
-दरम्यान, युगुलाला मुलगा परत हवा असल्याने त्यांनी सिव्हिल लाइन्समधील जिल्हा परिषद भवनमधील वसुंधरा समुपदेशन केंद्रात अर्ज केला. तेथील अधिकाऱ्यांनी अर्जाकडे दुर्लक्ष करीत हे प्रकरण दाबले.
-त्यानंतर युगुलाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी कारवाईचे निर्देश धंतोली पोलिसांना दिले. धंतोली पोलिसांनी अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. सध्या मुलगा बालकल्याण समितीच्या देखरेखीत आहे.
मुरकुटेची युगुलाविरुद्धच सीताबर्डीत तक्रार
अविनाश मुरकुटे दाम्पत्याने ४ जुलै २०२३ला युगुलाविरुद्धच पैशाची मागणी व आत्महत्येची धमकी दिल्याची तक्रार सीताबर्डी पोलिस ठाण्यात केली. येथील एका अधिकाऱ्याने युगुलाला चौकशीसाठी बोलाविले. युगुलाने घडलेला प्रकार सांगितला. मात्र, येथील अधिकाऱ्याने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे युगुलाने पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली. आयुक्तांच्या निर्देशानंतर चौघांना अटक झाली.