नांदेड जिल्ह्यातील नायगाव नरसी येथे रविवारी ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा होणार आहे. ओबीसी समाजाकडून सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ६० एकरच्या जागेत ही सभा होणार असून पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांकडून केला जात आहे. या सभेला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसींचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. पण छगन भुजबळ हे मात्र या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.
दरम्यान ओबीसींच्या अनेक सभा झाल्या, पण नांदेडच्या सभेला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहेत. ओबीसीच्या व्यासपीठावरून प्रकाश आंबेडकर काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर ओबीसीच्या महामेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.
पंढरपूरच्या सभेला भुजबळ उपस्थिती अन् नांदेडच्या सभेला गैरहजेरी
ओबीसी समाजाच्या आतापर्यंत अनेक सभा पार पडल्या. सर्वच सभेला ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावत सभा गाजवली. शनिवारी देखील पंढरपूरच्या सभेला छगन भुजबळ उपस्थित होते, पण नांदेडच्या सभेकडे त्यांनी पाठ फिरवली. राजकीय कार्यक्रमामुळे भुजबळ यांनी नांदेडच्या सभेला येण्यास टाळल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे नांदेडच्या सभेसाठी छगन भुजबळ यांनी ७ जानेवारीची तारीख दिली होती, त्यानुसारच संयोजकांनी तयारी देखील सुरु केली, पण आयोजकांमध्ये सुरु असलेल्या गटबाजीमुळे भुजबळ यांनी नांदेडच्या सभेला येण्यास टाळलं अशी चर्चा देखील आता सुरु आहे.