‘साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर याचा सख्खा मामा नामदेव महिपती कानगुडे आणि मावस मामा विठ्ठल किसन गांदले यांचाही गुन्ह्यात सहभाग आहे. शरद मोहोळ आणि कानगुडे यांच्यात दहा वर्षांपूर्वी वाद झाला होता. त्या वेळी कानगुडे सुतारदरा येथेच राहत होता. मात्र, मोहोळसोबत वाद झाल्यानंतर त्याच्यावर सुतारदरा सोडण्याची वेळ आली. नंतर तो भूगावला स्थायिक झाला. गांदले याच्यासोबतही मोहोळचा वाद होता. मामांच्या या वादातूनच मोहोळचा खून केल्याचे मुन्ना याने चौकशीत कबूल केले,’ अशी माहितीही पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारचीच निवड का?
शरद मोहोळवर पोळेकर, गांदले आणि अमित कानगुडे यांनी गोळ्या झाडल्या. त्या वेळी मोहोळचे आणखी दोन साथीदार त्यांच्यासोबत होते. आरोपी कायमच पिस्तूल घेऊन ‘गेम’ करण्याच्या तयारीत असत. मात्र, ठिकाण आणि मोहोळसोबत असणारी समर्थकांची गर्दी, यामुळे ते शक्य झाले नाही. शुक्रवारी आरोपी वगळता केवळ दोघेच मोहोळसोबत असल्याचे पाहून आरोपींनी डाव साधला. यापूर्वी आरोपींनी गोळी चालवण्याचा सरावही केला होता, असे समोर आले आहे.
असे सापडले आरोपी…
मोहोळच्या खुनानंतर कोथरूड पोलिसांसह गुन्हे शाखेची नऊ पथके आरोपींचा शोध घेत होती. खंडणीविरोधी पथक क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांना मुन्ना पोळेकरच्या कारचा नोंदणी क्रमांक मिळाला. त्याआधारे त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपर्क साधून सर्व टोल नाक्यांवर कळवले होते. मोबाइल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषणही करण्यात येत होते. त्या वेळी खेड-शिवापूर टोल नाक्यावर पोळेकरची कार दाखल झाल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला प्राप्त झाली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त होताच, आरोपी सातारा महामार्गाने जात असल्याचे स्पष्ट झाले.
खंडणीविरोधी पथक एक व दोनचे अधिकारी आणि अंमलदार तातडीने खेड-शिवापूरच्या दिशेने रवाना झाले. सातारा पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून सातारा महामार्गावर शिरवळ आणि आणेवाडी टोलनाका येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. मात्र, खेड-शिवापूर येथून बराच वेळ झाल्यानंतरही गाडी शिरवळला पोहोचली नाही. दरम्यान, पुणे पोलिस खेड-शिवापूर टोल नाका ओलांडून पुढे आले असता, किकवी गावाच्या जवळ संशयित कार आणि तेथे जवळच काही लोकांचा घोळका असल्याचे दिसले. पोलिसांनी खात्री करून तेथे घेराव घालून आरोपींना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, पोलिसांना समोर पाहूनही एकाही आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही.
Read Latest Maharashtra News And Marathi News