हायलाइट्स:
- काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षांचा मेळावा बेकायदेशीर
- पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
- करोनाचे नियम मोडून मेळाव्यात ८०० ते ९०० कार्यकर्ते एकत्रित
सांगली : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर विशाल पाटील यांनी बुधवारी सांगलीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परवानगी न घेताच हा मेळावा आयोजित केल्याबद्दल पोलिसांनी सांगली पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.
कोविडचे नियम धाब्यावर बसवून मेळावा आयोजित करून बेकायदेशीर मोटारसायकल रॅली काढल्या प्रकरणी मेळाव्याच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उदय यशवंत पवार, हेमंत उर्फ बंडू पाटील, प्रतीक गंगाधर बजबळे, अवधूत नितीन पाटील, ज्ञानेश्वर काळेल, मारलेश भिकाजी झेंडे आणि निहाल लाडसाब शेख (सर्व रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १ सप्टेंबर रोजी वसंतदादा स्मृती स्थळावर विशाल पाटील यांच्या समर्थकांकडून दिशा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी वसंतदादा गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अजून कायम आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनीच मेळाव्याचे आयोजन करू नका, असे आवाहन केले असतानाही विशाल पाटील यांच्या समर्थकांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामध्ये कोविडच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली होती. अनेक सहभागी कार्यकर्त्यांनी तोंडावर मास्क लावले नव्हते.
मेळाव्याच्या सुरुवातीला ५० ते ६० कार्यकर्त्यांनी मोटारसायकलवरून रॅली काढली. वसंतदादा समाधीस्थळी विना परवाना कार्यक्रम घेऊन ८०० ते ९०० कार्यकर्त्यांना एकत्रित केले. जिल्हाधिकऱ्यांच्या आदेशाचा भंग करून पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केले.
कोविड नियमांचे उल्लंघन करीत बेकायदेशीररित्या मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल पोलिसांनी संयोजकांवर गुन्हे दाखल केले. विनापरवानगी रॅली काढणे, रॅलीत विनामास्क सहभाग घेणे, सुरक्षित अंतर नियमांचे पालन न करता संसर्गजन्य आजाराच्या फैलावास कारणीभूत ठरल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेळाव्यात भाषणबाजी करणार्या नेत्यांवर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेले नाही. याउलट कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे नेते नामानिराळे राहिले, तर कार्यकर्त्यांना मात्र पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.