मी नायलॉन मांजा वापरणार नाही…; हजारो नागपूरकरांनी घेतली शपथ, मनपाच्या कार्यशाळेत संकल्प

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘पतंग उडविण्याचा आणि दुसऱ्याची पतंग काटण्याचा आनंद मोठा असला तरी… यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाने अनेकांचे बळी घेतले. मुक्या प्राण्यांसह पक्षीही जखमी होऊन तडफडत मृत्युमुखी पडतात. त्यामुळे मी पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही आणि माझ्या परिसरामध्ये कुणालाही नायलॉन मांजाचा वापर करू देणार नाही’, अशी शपथ शनिवारी हजारो नागपूरकरांनी घेतली. निमित्त होते, कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यशाळेचे.

-नायलॉन मांजाचे धोके मांडणारा वृत्तांत ‘मटा’ने प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांनीही रोष व्यक्त करत कठोर अंमलबजावणीची मागणी केली. या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा घेण्यात आली.

-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलिस उपायुक्त अर्चित चांडक, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

-बंदी असलेल्या नायलॉन मांजावर अंमलबजावणी बाबत चर्चा, इकोब्रिक्स प्रशिक्षण व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी नागपूर महापालिका अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.

-तसेच प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी ‘इकोब्रिक्स’ हा चांगला पर्याय असून, मनपाच्या शाळांमध्ये ६ ते २६ जानेवारीदरम्यान इकोब्रिक्सबाबत जनजागृती व स्पर्धेचे आयोजन केल्या जाणार आहे. विद्यार्थांनी मोठ्यासंखेत स्पर्धेत सहभागी होत शहर सौंदर्यीकरणात हात भर लावावा, असे आवाहन आंचल गोयल यांनी यावेळी केले.
मांजाचा गळा कोण आवळणार? नागपूरकरांचा प्रशासनाला सवाल; कायदे, अटी, नियम अस्तित्वात असूनही झेप थांबेना
शिक्षकांनी घ्यावी जबाबदारी!

नायलॉन मांजा हा संपूर्ण पर्यावरणासाठी घातक आहे. या नायलॉन मांजामुळे आजपर्यंत शेकडो नागरिक आणि निरपराध पक्ष्यांचे बळी गेले आहेत. नागपुरातून नायलॉन मांजाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजात शिक्षकांचे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे आहे, शिक्षकांमार्फत थेट घराघरापर्यंत पोहोचले जाऊ शकते. शिक्षक हे केवळ एक विद्यार्थी घडवीत नाहीत तर, ते संपूर्ण समाज घडवितात. शिक्षकांनी मनावर घेतल्यास समाजात नक्कीच सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थांना नायलॉन मांजाबाबत जागरूक करायला हवे, असे आवाहनही आंचल गोयल यांनी केले.

Source link

makar sankranti 2024nagpur municipal carporationNagpur newsnagpur zpnylon manja bannylon manja boy throat cutnylon manja nagpur
Comments (0)
Add Comment