सहा महिन्यांच्या कालावधीत ‘चांद्रयान ३’, ‘एक्स्पोसॅट’पाठोपाठ आता ‘आदित्य एल १’ मोहिमेलाही मोठे यश मिळाल्यामुळे भारतीय खगोल संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे. इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘एल १’ भोवतीच्या कक्षेत यानाचा प्रवेश करण्यासाठीचे निकष पूर्ण झाल्यानंतर शनिवारी दुपारी यानाचे नियंत्रक इंजिन अल्पावधीसाठी सुरू करण्यात आले. या प्रक्रियेतून आदित्य यानाला दुपारी चारच्या सुमारास ‘एल १’ बिंदूभोवतीची त्रिमितीय ‘हॅलो कक्षा’ प्राप्त झाली. या कक्षेतून यान सूर्याभोवती फिरतानाच ‘एल १’ बिंदूभोवती सुमारे १७८ दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण करील. पृथ्वी आणि सूर्यादरम्यानच्या काल्पनिक रेषेवर ‘एल १’ बिंदू असल्याने पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणादरम्यान त्याच्या स्थानात थोडा बदल होतो. या बदलाला अनुसरून मोहिमेच्या कार्यकाळात ‘आदित्य एल १’च्या कक्षेत नियमितपणे सुधार करावा लागणार आहे.
आदित्य यानावरील सर्व सात उपकरणांची तपासणी याआधीच पूर्ण झाली असून, त्यांच्याकडून अपेक्षित वैज्ञानिक नोंदी मिळत असल्याचे इस्रोने सांगितले आहे. यानावर पुण्यातील ‘आयुका’च्या पुढाकाराने विकसित करण्यात आलेल्या ‘सोलार अल्ट्रा व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’सह (सूट) व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनोग्राफ (व्हीईएलसी), सोलार लो एनर्जी एक्सरे स्पेट्रोमीटर (सोलेक्स), हाय एनर्जी एल १ ऑर्बायटिंग एक्सरे स्पेक्ट्रोमीटर (हेल १ ओएस), आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सप्रिमेन्ट (अस्पेक्स), प्लाझ्मा ॲनालायजर पॅकेज फॉर आदित्य (पापा) आणि मॅग्नेटोमीटर ही उपकरणे बसवण्यात आली आहेत.
मोहिमेचा कार्यकाळ वाढणार
इस्रोला अपेक्षित असलेली नेमकी कक्षा प्राप्त झाल्यामुळे यानाच्या इंधनाची बचत होणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहिमेचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करण्यासाठी यानामध्ये ६० किलो इंधन असणे आवश्यक होते. मात्र, पृथ्वीपासून ‘एल १’पर्यंतच्या प्रवासात यानाच्या कक्षेत अचूक बदल केल्यामुळे इंधनाची मोठी बचत झाली. आदित्य यानामध्ये सध्या १०० किलो इंधन शिल्लक असून, वैज्ञानिक उपकरणे सक्रिय राहिल्यास ‘आदित्य एल १’ मोहीम दीर्घ काळ सक्रिय राहू शकेल.
‘आदित्य एल १’ला त्याच्या नियोजित कक्षेत पोचवून भारताने महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांमुळे अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या मोहिम यशस्वी झाली. सर्व देशवासीयांसोबत मीही भारतीय शास्त्रज्ञांच्या असामान्य कामगिरीचे कौतुक करतो. मानवी कल्याणासाठी अशाच प्रकारे आम्ही विज्ञान क्षेत्रात प्रगती साधत राहू.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान