पोलिसांच्या ‘दिशा उपक्रमां’तर्गत झोपडपट्ट्यांतील अल्पवयीन गुन्हेगार, व्यसनी, शाळाबाह्य मुलांना हेरून त्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या माध्यमातून शहरातील ७२ झोपडपट्ट्यांतील ४०० मुलांचे ३२ फुटबॉलचे संघ तयार केले आहेत. ‘संदेश बोर्डे स्पोर्ट फाउंडेशन’च्या मदतीने या मुलांना फुटबॉलचे धडे देण्यात येत आहेत.
शहरात सत्तरहून अधिक झोपडपट्ट्या आहेत. तेथील अनेक मुले अर्ध्यातूनच शिक्षण सोडून देतात. शिक्षणाच्या अभावामुळे ही मुले आपसूकच गुन्हेगारीकडे वळतात. त्यातून बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या झोपडपट्ट्यांमधील मुलांची यादी तयार करून पोलिसांनी त्यांचे समुपदेशन केले. गुन्हेगारीकडे वळाल्यानंतर आयुष्य कसे मातीमोल होते, हे त्यांना समाजावून सांगण्यात आले.
दररोज दोन तास सराव
– झोपडपट्टीत राहणारी मुले शाळेतून आल्यानंतर थेट मैदानात दाखल होतात.
– त्यानंतर त्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जाते.
– दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या दरम्यान हे प्रशिक्षण चालते.
– मुलांचा व्यायामही करून घेतला जातो.
– ‘मुले मनापासून मैदानात घाम गाळत असल्याने त्यांना चुकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. शाळा आणि खेळ या दोन गोष्टींमध्ये मुले व्यग्र झाल्यामुळे त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती संपुष्टात आली आहे,’ असे पोलिसांनी सांगितले.
अठरा खेळाडूंनी गाजवले सामने
‘संदेश बोर्डे स्पोर्ट फाउंडेशन’च्या मदतीने सुरू असणाऱ्या या उपक्रमाच्या मदतीने गेल्या काही वर्षांत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणारी १८ मुले फुटबॉल खेळाडू म्हणून नावारूपाला आली आहेत. या खेळाडूंनी आतापर्यंत जिल्हास्तरीय ते राज्यस्तरीय फुटबॉल सामने गाजवले आहेत.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. माझी आई झोपडपट्टीतील कचरावेचकांच्या मुलांना सांभाळण्याचे काम करीत होती. तिच्या निधनानंतर या मुलांच्या आयुष्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न मी करीत आहे.- संदेश बोर्डे, संस्थापक, संदेश बोर्डे स्पोर्ट क्लब
अल्पवयीन गुन्हेगार, शाळाबाह्य; तसेच गुन्हेगारीकडे वळू शकणारी मुले हेरून त्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे. पिंपरीतील ७२ झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्येकी एक पोलिस अधिकारी आणि प्रशिक्षकाची नेमणूक केली असून, मुलांच्या प्रशिक्षणाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली आहे. या उपक्रमामुळे बाल गुन्हेगारीला आळा बसला असून, रस्त्यावरील गुन्हेही घटले आहेत.- डॉ. विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी