अनेक ठिकाणी विक्री केंद्रे असणाऱ्या काही औषध विक्रेत्यांच्या साखळ्या व्यवसाय वाढवण्याच्या हेतूने दुकानांमधून अशा प्रकारची जाहिरात करतात. त्यामुळे ग्राहक आकृष्ट होऊन सवलतीच्या दरामध्ये औषधे विकत घेतो. या पार्श्वभूमीवर किरकोळ आणि घाऊक अशा दोन्ही विक्रेत्यांना विकत घेतलेल्या औषधांची बिले गरजेनुसार सादर करण्यास ‘एफडीए’ने सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याबाहेरून काहीवेळा औषधे खरेदी केली जातात. औषधांची ही खरेदी सातत्याने केली जाते. त्यामुळे दर्जाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या बाहेरील औषधांना राज्यात प्रवेश मिळतो.
ज्या औषधांवर सवलत दिली जाते त्यांची जाहिरातही केली जाते. पत्रके वाटली जातात. त्यामुळे काउन्सिलने अशा प्रकारे औषधांच्या विक्री-खरेदीची माहिती देण्याचे निर्देश दिल्याचे ‘एफडीए’तील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. नव्या वर्षामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर ‘एफडीए’ने विविध पातळ्यांवर गुणात्मक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एफडीए’चे सहआयुक्त (औषधे) भूषण पाटील यांनी या माहितीस दुजोरा दिला.
औषधांच्या काही साखळी दुकानांमधून घाऊक सवलतीमध्ये औषधे विकण्याची जाहिरात केली जाते. प्रत्यक्षात रुग्ण वा ग्राहकांना तितकी सवलत मिळत नाही. मागील काही वर्षांमध्ये वाढलेले ऑनलाइन फार्मसीचे जाळे आणि औषधांची ठरावीक कंपन्यांची साखळी दुकाने यामुळेही ही स्पर्धा वाढली आहे. ‘एफडीए’कडे थेट औषधांच्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी फार्मसी काउन्सिलला यासंदर्भात कळवण्यात येणार आहे. राज्यातील औषध निरीक्षकांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
२.८५ कोटी रुपये किंमतीची बनावट औषधे जप्त
‘एफडीए’ने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान २.८५ कोटी रुपये किंमतीची बनावट औषधे जप्त केली आहेत. या संदर्भातील विविध प्रकरणांमध्ये तीस जणांना अटक झाली. तर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.₹ १९००हून अधिक परवाने निलंबित करण्यात आले. विविध ठिकाणी टाकलेल्या ५३ छाप्यांमधून ६,७७९ दुकानांमध्ये अवैधरित्या औषधांचा साठा करणे, चुकीच्या पद्धतीने खरेदी-विक्रीच्या नोंदी ठेवणे या प्रकारांसाठी कठोर कारवाई करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८९२ किरकोळ दुकाने आणि १,०२२ औषधांच्या दुकनांचे परवाने रद्द झाले आहेत.