सोमवारी राऊत यांनी शिर्डीत दर्शन घेतले. यावेळी माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, सचिन कोठे शिवसेना तालुका अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रभा घोगरे, संजय छल्लरे, सुयोग सावकारे, श्रीकांत मापारी यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे गटात अनेक इच्छुक असल्याच्या प्रश्नावर बोलताना खासदार राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले, आम्ही शिवसेनेचा ठाकरे गट मानत नाही. एकनाथ शिंदे शिवसेना स्थापन करायला कुठे गेले होते? जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत असतील किंवा नसतीलही. ५५ वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तीच खरी शिवसेना आहे.
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्षांवर न्यायदानाची जबाबदारी असते. ‘ते सो कॉल्ड न्यायमूर्ती’ मुख्यमंत्र्याकडे काल गेले होते. तेथे बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे न्यायमूर्तीच फुटताना दिसत आहेत. जर न्यायमूर्तीच असे आरोपीकडे जाऊन चहा प्यायला लागले, तर त्यांचेकडून नि:पक्ष न्यायाची कशी अपेक्षा करणार?
शिर्डीत येऊन राऊत यांनी विखे पाटलांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, खासदार सुळे यांची मागणी योग्यच आहे. मात्र, त्यावर अगोदर लवासाची श्वेतपत्रिका काढा म्हणणारे महसूलमंत्री नाही तर आमसूलमंत्री आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्याची अदलाबदल करण्यासंबंधी कोणतही चर्चा झालेली नाही. मात्र शिवसेनेकडून माजी मंत्री शंकरराव गडाख त्या जागेसाठी एक प्रबळ आणि योग्य उमेदवार आहेत, असेही राऊत म्हणाले.