या प्रकरणातील आरोपी सोनाली चव्हाण खारघर सेक्टर-१२ मधील अनमोल को. ऑप. सोसायटीत पती आणि मुलासह राहात होती. जून २०२० मध्ये सोनाली चव्हाण आणि आशिष लवाटे या दोघांनी स्वामी कृपा बिझनेस सोल्युशन प्रा. लि. ही कंपनी सुरू केली होती. या कंपनीच्या एस. आय. पी. फ्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा होईल, असे आमिष दाखविण्यास सुरुवात केली होती. या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून खारघरमध्ये राहणाऱ्या दीपाली पाटील यांनी डिसेंबर २०२० मध्ये ७ लाख रुपये चेकद्वारे आणि १ लाख ११ हजार रुपये रोख सोनाली चव्हाणकडे दिले होते.
दीपाली पाटील यांना फेब्रुवारी २०२२मध्ये मुळ मुद्दल आणि त्यावरील परतावा असे एकूण १० लाख ७ हजार ८२९ रुपयांची रक्कम सोनालीकडून मिळणार होती. मात्र फेब्रुवारी २०२२ मध्ये सोनालीने नवीन सोन्याच्या नाण्यांच्या योजनेबद्दल माहिती देऊन गुंतवणुक केल्यास चांगला फायदा होत असल्याचे सांगितले. त्यावेळी दिपाली पाटील यांच्यासह इतर गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली. त्यानंतर सोनालीने सुरुवातीला या गुंतवणुकदारांना सोन्याची नाणी परतावा रूपात देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सोनाली चव्हाण आणि आशिष लवाटे यांनी सोने महाग झाल्याने सदर योजना सहा महिन्यांनंतर बंद करणार असल्याचे सांगितले.
शेवटची संधी म्हणून ४२ हजार रुपये दराने सोन्याची नाणी देण्याचे आमिष दाखवून अधिक गुंतवणूक करण्यास सांगितले. दीपाली पाटील, त्यांचे नातेवाईकांनी आणि इतर २५ गुंतवणुकदारांनी तब्बल १ कोटी १३ लाख रुपये गुंतवणूक केली. परतावा देण्याची वेळ आल्यानंतर या दोघांनी या रक्कमेचा अपहार करून पलायन केले. त्यामुळे फसवणूक झालेल्या या गुंतवणूदारांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. १ कोटी १३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलि निरीक्षक राजीव शेजवळ यांनी दिली.