हायलाइट्स:
- बोईसर येथील कपड्याच्या फॅक्टरीत स्फोटानंतर आग
- दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर चार जण जखमी
- आग आटोक्यात, जखमींवर उपचार सुरू
नरेंद्र पाटील । पालघर
बोईसर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत स्फोट होऊन नंतर भडकलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (One dead, Six Injured in Boisar Factory Explosion)
जखारिया फॅब्रिक लिमिटेड या कंपनीत सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की स्फोटाचे आवाज तीन ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आले. कपड्याची कंपनी असल्यामुळं स्फोटानंतर लगेचच आग भडकली. दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात आठ कामगार काम करीत होते. स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका कामगाराचा मृतदेह कारखान्यात आढळून आला आहे, तर छोटेलाल सरोज नामक कामगार बेपत्ता आहे. सहा कामगार जखमी झाले आहेत, त्यांच्यावर बोईसरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकानं त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
मिथिलेश राजवंशी असं मृत कामगाराचं नाव आहे. तर, छोटे लाल सरोज हा कामगार बेपत्ता आहे. जखमींमध्ये गणेश विजय पाटील, अरविंद यादव, मुरली गौतम, अमित यादव, मुकेश यादव आणि उमेश राजवंशी यांचा समावेश आहे.