Nashik News: नायलॉनची आसारी, थेट तडीपारी! मांजा बाळगल्याने एकाच दिवसात ४२ जण तडीपार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नायलॉन व इतर घातक मांजाची विक्री, साठा करणे अथवा तो जवळ बाळगणे यावर बंदीचे आदेश असल्याने काही दिवसांपासून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. पोलिस आयुक्तालयाने तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवसांत तब्बल ४२ जणांना तडीपार केले आहे. पुढील वीस दिवस या संशयितांना शहरासह जिल्ह्यात वावरण्यास व मुक्कामास प्रतिबंध करून पोलिसांनी सणाचा ‘धागा’ सुरक्षित केला आहे.

मांजामुळे माणसांना व पक्ष्यांना होणारी गंभीर इजा विचारात घेता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश काढले आहेत. या आदेशान्वये पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि मोनिका राऊत यांनी विभागस्तरीय कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार तेरा पोलिस ठाणे व गुन्हे शाखांच्या पथकांनी संशयितांची धरपकड केली. या कारवाईअंती पंचवटी विभागाचे सहायक आयुक्त नितीन जाधव यांनी सात, सरकारवाडा विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी तेवीस, अंबड सहायक आयुक्त शेखर देशमुख व नाशिकरोडचे सहायक आयुक्त आनंदा वाघ यांनी प्रत्येकी सहा संशयितांना तडीपार केले आहे. शहर पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे नायलॉनसह इतर घातक मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शिवाय, या स्वरुपाची कारवाई पुढील काही दिवस सुरू ठेवणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाने दिली.

– आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त मांजा हस्तगत
– संशयितांमध्ये १८ ते २७ वयोगटातील तरुण अधिक
– ऑनलाइन मांजाची खरेदी; छुप्या पद्धतीने विक्री
– तडीपारीमुळे नायलॉन मांजा विक्री नियंत्रणात
– सुरक्षित सणोत्सवासाठी नाशिक पोलिसांची भूमिका

पोलिस ठाणे – तडीपार
आडगाव – ३
म्हसरूळ – २
पंचवटी – २
भद्रकाली – ५
सरकारवाडा – ८
गंगापूर – ५
मुंबई नाका – ५
सातपूर – १
अंबड – २
इंदिरानगर – ३
उपनगर – ३
नाशिकरोड – २
देवळाली कॅम्प – १
एकूण – ४२
नाशिकच्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रांत; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, १० जणांवर गुन्हे दाखल
मांजासह दुचाकी जप्त

सातपूर पोलिसांनी दोन विक्रेत्यांवर गुन्हा नोंदवून दुचाकीसह नायलॉन मांजा जप्त केला. यात पोलिसांनी पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ओम भामरे (रा. कामटवाडे) व ओम पवार (रा. शिवशक्ती चौक, सिडको) अशी संशयितांची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीवरून फिरत असताना पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे मांजा आढळल्याने त्यांना ताब्यात घेत गुन्हा नोंदवण्यात आला.

नायलॉन व इतर घातक मांजा विक्री, साठा करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले आहेत. या संशयितांना २५ जानेवारीपर्यंत हद्दपार केले आहे. पुढेही कारवाई सुरू ठेवत संशयितांना ताब्यात घेत हद्दपारीची कारवाई करणार आहोत. त्यामुळे कोणीही सणोत्सव काळात घातक मांजा वापरू नये.- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-१

Source link

makarsankranti 2024Nashik newsnashik nylon manja casenylon manja banNylon manja sales controlnylon manja Seized in nashiknylon manja seller in nashik
Comments (0)
Add Comment