या प्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चार जानेवारीला रात्री साडेअकराच्या सुमारास रामटेकडी येथील किर्लोस्कर पुलावर घडला. अपघातग्रस्त तरुणी खराडी येथील एका कंपनीत नोकरीस आहे. ती चार जानेवारीला रात्री मैत्रिणीच्या दुचाकीवर पाठीमागे बसून घरी जात होती. त्या वेळी किर्लोस्कर पुलावर त्यांची दुचाकी आली असता, अचानक तरुणीच्या डोळ्याच्यावर दगडाचा घाव बसला. त्यात तरुणी गंभीर जखमी झाली. तिची शुद्ध हरपली. तेव्हा तिच्या मैत्रिणीने कुटुंबीयांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. तरुणीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तरुणीवर डोळे, कपाळाच्या हाडाशी संबंधित आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असून, अद्यापही ती रुग्णालयातच आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी कसरत
गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांना पोलिसांनी सहकार्य केले नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. घटना चार जानेवारीला रात्री घडली. त्यानंतर तरुणीचे कुटंबीय जवळच्या वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. त्या वेळी त्यांना ‘ती आमची हद्द नसून, तुम्ही हडपसर पोलिस ठाण्यात जावा’ असे सांगितले. हडपसर पोलिसांनीही तक्रार दाखल करून घेण्यास तत्परता दाखवली नाही. ‘अज्ञात व्यक्तीला कसे शोधणार, तुम्हाला ती व्यक्ती माहिती आहे का,’ असे प्रतिप्रश्न करून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. अखेरीस तरुणीच्या कुटुंबीयांनी एका लोकप्रतिनिधीमार्फत पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा सात जानेवारीला गुन्हा दाखल करून घेण्यात आला.
विशेषत: महिलांवरच हल्ला
रामटेकडी परिसरात या माथेफिरूचा वावर असतो. गेल्या काही दिवसात या माथेफिरूने रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांना किंवा महिला बसलेल्या कारवर दगड मारल्याच्या तक्रारी आहेत. यात काही गाड्यांच्या काचाही फुटल्या आहेत, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
हे हल्ले थांबवणार कोण?
रामटेकडी येथे सातत्याने होत असलेले हल्ले थांबवणार कोण, असा प्रश्न पडला आहे. कारण, स्थानिक नागरिकांनी एका संशयित तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याच्याविरोधात पुरावे नसल्याचे सांगून पोलिसांनी त्याला सोडून दिले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी गस्त वाढवली आहे, रात्रीच्या वेळेला तेथे पोलिस कर्मचारी नेमले आहेत, असे काहीही अद्याप घडल्याचे दिसून येत नाही.
माथेफिरूच्या कृत्याचा माझ्या बहिणीला मोठा फटका बसला आहे. भविष्यात हा प्रकार कोणाच्या जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे पोलिसांनी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.
– अपघातग्रस्त तरुणीचा भाऊ