‘सिंहस्थ’चे महत्त्व आता थेट जागतिक स्तरावर पोहोचले असून, समाजमाध्यमांनी क्षणार्धात सातासमुद्रापार माहिती प्राप्त होत आहे. मात्र, प्रत्यक्षात भौगोलिक अडचणींचा सारासार विचार करीत नियोजन करण्याची गरज भासणार आहे.
शाही मिरवणुकीचे नियोजन काय?
त्र्यंबकेश्वर येथे शैव साधुंचे एकूण दहा आखाडे आहेत. त्यांचे शाहीस्नान तीर्थराज कुशावर्तावर होत असते. इतरत्र होणारा कुंभमेळा आणि त्र्यंबकचा सिंहस्थ यामध्ये असलेला महत्त्वाचा फरक जाणून घेऊन नियोजन करावे लागणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे साधुंचे आखाडे शहर वस्तीच्या चारही बाजूंना विखुरलेले आहेत. कुशावर्त तीर्थ शहराच्या मध्यवस्तीत आहे. आखाड्यांचे साधू शाहीस्नानासाठी मिरवणुकीने कुशावर्तावर येतात आणि स्नान झाल्यानंतर मिरवणुकीने त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी जातात. तेथून आखाड्यात परत जात असतात. याबाबतचे सर्व रस्ते पूर्वापार ठरलेले आहेत. त्यांना ‘शाहीमार्ग’ असे संबोधले जाते. या शाहीमार्गावर जेव्हा मिरवणूका चालतात तेव्हा भाविक बाजूला उभे राहतात. मात्र, सद्यस्थितीला शाहीमार्ग कसे आहेत व ‘सिंहस्थ २०१५’मध्ये कुशावर्त तीर्थ ते मंदिर या मुख्य मार्गावर मिरवणुका काढताना धरसोड केली. कुशावर्त तीर्थ ते त्र्यंबकेश्वर मंदिर या एकमेव मार्गाने सर्व आखाड्यांच्या मिरवणुका जातात याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची अपेक्षादेखील व्यक्त होत आहे.
आरक्षणांबाबत उदासीनता
आजच्या घडीला त्र्यंबक शहरासाठी पूर्वापार निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणांचा नेमका प्रशासनाला विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करताना ‘सिंहस्थ’ दुय्यम स्थानावर आणि रहिवासी क्षेत्र तयार करण्यास प्रथम प्राधान्य असा प्रकार दिसला. विकास योजना मंजूर झाली तरीदेखील किरकोळ फेरबदलांच्या नावाने ‘सिंहस्था’साठी असलेली आरक्षणे उठवण्याचा दळभद्री कारभार सुरूच राहिला आहे.
नाशिक भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्र्यंबकेश्वर-नाशिक आणि प्रयागराज या दोन्ही ठिकाणच्या सिंहस्थ-कुंभमेळा नियोजनाची घोषणा करावी. त्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. या भेटीदरम्यान स्मरणपत्र देण्यात येणार आहेत.- महंत शंकरानंद सरस्वती महाराज, आखाडा परिषद
…अशा आहेत अपेक्षा
– सिंहस्थ प्राधिकरण स्थापन करण्यात यावे
– नाशिक व त्र्यंबकेश्वर स्वतंत्र कुंभमेळा अधिकारी असावा
– नाशिक-पुणे रेल्वेचा त्र्यंबकपर्यंत विस्तार करण्यात यावा
– बेझे चाकोरेतील चक्रतीर्थ येथे साधू व भाविकांसाठी सुविधांची मागणी
– प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या वैतरणा नदी घाटाचा विकास
– नाशिक-त्र्यंबक रस्ता सहापदरी करून थेट नाशिकरोडला जोडावा
– कसारा रेल्वे स्टेशन ते त्र्यंबकेश्वर स्वतंत्र बससेवा सुरू करा
– बस महामंडळाने ‘सिंहस्थ कुंभमेळा’ नावाने स्वतंत्र बससेवा सुरू करावी
– साधुग्राम, भक्तग्राम, वाहनतळसह सिंहस्थ कालावधीतील सुविधांची आतापासून योजना करावी
– अतिक्रमण हटवण्याचा कार्यक्रम आता सुरू केल्यास सिंहस्थात होणारा देखावा टाळावा
– सिंहस्थासाठी होणाऱ्या बांधकामांचा पुढील बारा वर्षांत भाविकांना उपयोग होईल याचा विचार करावा
– संत निवृत्तिनाथ पौषवारीसाठी ‘निर्मलवारी’ नावाने होणारा एक कोटी खर्च कायमस्वरूपी सुविधांसाठी करावा
– त्र्यंबकसाठी कोणत्याही एका धरणातून पाणीपुरवठा योजना राबवून दररोज २४ तास पाणी मिळेल असे नियोजन करावे