हायलाइट्स:
- महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये प्रचंड नाराजी
- राजू शेट्टी यांना आमदारकी नाकारल्याच्या चर्चेमुळं अस्वस्थता
- करेक्ट कार्यक्रम करण्याचा राजू शेट्टी यांचा इशारा
कोल्हापूर:महाविकास आघाडी सत्तेवर येऊन दीड वर्षे उलटली, तरीही सोबत असलेल्या मित्रपक्षांना सत्तेतील कोणतेच पद न दिल्याने आणि प्रत्येक बाबतीत गृहितच धरले जात असल्याने या पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आळवला जात आहे. राज्यात सध्या महामंडळ नियुक्तीचे वारे वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे पक्ष आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. आमदाकीवरून टोकाची भूमिका घेतलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठोपाठ इतरही पक्ष आता इशारा देण्याच्या मानसिकतेत आहेत.
राज्यात महाविकास आघाडी स्थापन करताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे प्रमुख पक्ष एकत्र आले. पण त्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला पन्नास पेक्षा अधिक पक्षांनी पाठिंबा दिला होता. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत काही पक्ष सहभागी झाले होते. यातील काही प्रमुख पक्षांना महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यात आले. राज्यात सत्ता आल्याने सत्तेत वाटा मिळेल या प्रतिक्षेत हे मित्र होते. पण दीड वर्षानंतरही त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नसल्याने त्यांच्याच नाराजी आहे. केवळ कागदावरच सत्तेत सहभाग मिळाला असून प्रत्यक्ष सत्तेचे कोणतेच लाभ आणि पद मिळत नसल्याने ही नाराजी वाढत आहे.
वाचा: धक्कादायक! चार हजार व्होल्टचा शॉक लागून गोळाफेकपटूचा मृत्यू
विविध घटक पक्षाचे आठ आमदार महाविकास आघाडीत आहेत. समाजवादी, स्वाभिमानी संघटना, शेकाप, बहुजन विकास आघाडी असे प्रमुख पक्ष या आघाडीत आहेत. यातील कुणाला तरी मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे काही झाले नाही. विधानपरिषद आणि राज्यसभा सदस्यांच्या बिनविरोध निवडी करतानाही या घटकपक्षांना विचारात घेतले नाही. मुळात राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून एकदाही या घटकपक्षांच्या नेत्यांबरोबर सत्ताधारी नेत्यांनी बैठक घेतली नाही. कोणत्याच विषयावर त्यांच्याशी चर्चा नाही. त्यांना गृहित धरूनच कारभार सुरू असल्याने हे पक्ष नाराज आहेत. राज्यपाल नियुक्त आमदार निवडीत राजू शेट्टी यांच्या नावाला कात्री लावल्याच्या वृत्ताने तर स्वाभिमानीसह इतर सर्वच पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.
वाचा: स्वत:ला कोकणसम्राट म्हणवून घेणाऱ्या नारायण राणेंना…; सुभाष देसाईंची बोचरी टीका
पंधरा दिवसापूर्वी घटक पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत नेत्यांनी आपली नाराजी उघड केली. भाजप शिवसेना सत्तेवर असताना तेदेखील स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम या पक्षांना अशीच वागणूक देत होते. आता महाविकास आघाडीतही तोच अनुभव येत असल्याने नाराजी वाढली आहे. सध्या राज्यात महामंडळ नियुक्तीचे वारे वाहत आहेत. या महामंडळावर घटक पक्षांना संधी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. महामंडळ वाटपाच्या बैठकीतही त्यांना निमंत्रण नव्हते. त्यामुळे महामंडळ देणार की नाही याबाबत शंका वाटत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हे घटकपक्ष आक्रमक झाले, त्यांनी स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाला ताकद दिली तर महाविकास आघाडीसमोरील अडचणी वाढणार आहेत.
विधानपरिषदेची आमदरकी हा राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी संघटनेतील एक समझोता होता. तो पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचे हे त्यांनी ठरवावे. त्यांनी आमचा करेक्ट कार्यक्रम केला तर त्यापलिकडचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना
महाविकास आघाडीतील घटक पक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना
समाजवादी पक्ष
जनता दल धर्मनिरपेक्ष
बहुजन विकास आघाडी
रिपाई ( प्रा. जोगेंद्र कवाडे गट )
लोकभारती पक्ष
रिपाई (सचिन खरात गट)
शेकाप, माकप, भाकप व अनेक पक्ष
दीड वर्षापासून महाविकास आघाडीतील घटक पक्ष सन्मानाच्या प्रतिक्षेत आहेत. घटक पक्षाची ताकद हवी असेल तर त्यांना पदाची ताकद द्यावी ही माफक अपेक्षा आहे. लवकरात लवकर नेत्यांनी याबाबत निर्णय घ्यावा
सचिन खरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया