ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या घरी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि मालमत्तांची पडताळणी सुरु असल्याची माहिती आहे. परंतु नेमक्या कोणत्या प्रकरणात सर्च ऑपरेशन सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मंगळवारी दुपारच्या सुमारास इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली. आता या धाडीत इन्कम टॅक्स विभागाच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या अनुषंगाने विचारेंवर कुठली कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राजन विचारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमटाऊन असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार आहे. विचारे सलग दुसऱ्यांदा ठाण्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत. याआधी त्यांनी आमदारकी आणि नगरसेवकपदही भूषणवलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरेंसोबत निष्ठावंत राहिलेल्या शिलेदारांमध्ये विचारेंचा समावेश आहे.
याआधी, ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांची विश्वासू रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली होती. ईडीच्या पथकाने मंगळवारी सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकलेली. ईडीच्या या पथकात १० ते १२ अधिकाऱ्यांचा समावेश होता. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साधारण साडेआठ वाजताच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर वायकर यांच्या घराची ईडीने झाडाझडती घेतली. वायकरांशी संबंधित सात ठिकाण्यांवर ईडीची छापेमारी सुरु असून यामध्ये त्यांच्या भागीदारांच्या घरांचाही समावेश आहे. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते.
या निमित्ताने ठाकरे गटाचा आणखी एक नेता तपास यंत्रणांच्या कचाट्यात सापडला आहे. यापूर्वी संजय राऊत, अनिल परब या ठाकरे गटातील नेत्यांच्या घरी ईडीच्या धाडी पडल्या होत्या. यापैकी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती आणि त्यांना तब्बल तीन महिने तुरुंगात राहावे लागले होते.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News