हायलाइट्स:
- कोकणात राष्ट्रवादीमध्ये भूकंप
- आगामी निवडणुकांच्या तोंडावर शहराध्यक्षांचा राजीनामा
- ‘या’ पक्षात प्रवेश निश्चित झाल्याची गुप्त माहिती
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरात राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला आहे. वरिष्ठ नेते पक्ष वाढवण्यासाठी मनाप्रमाणे काम करू देत नसल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी दिली. आझ सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेत हा राजकीय भूकंप केला आहे. त्यामुळे कोकणात हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आगामी काळात कोणत्या पक्ष्यातून काम करणार हे मात्र चिकणे यांनी लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचे खात्रीलायक वृत आहे. यावेळी चिकणे यांच्यासोबत शहर सचिव तुषार सापटे उपस्थित होते. यावेळी चिकणे म्हणाले की, मी राष्ट्रवादी पक्षाचे काम पक्ष स्थापने पासून करत होतो. गेल्या चार वर्षांपासून माझ्याकडे पक्षाने शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. परंतु गेल्या पालिका निवडणुकीत पक्षाचे चिन्ह बाजूला ठेऊन आघाडी झाली आणि तेव्हापासून मला शहराध्यक्ष म्हणून शहरात पक्ष वाढवण्यासाठी वरीष्ठ पदाधिकारी व नेते काम करू देत नाहीत.
गेल्या दीड वर्षापासून पक्षात शहरातील राजकारणात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत मला सहभागी करून घेतले जात नसून अक्षरशः गळचेपी सुरू आहे, असा आरोप केला आहे. त्यामुळे हे शहराध्यक्ष पदाचे शोभेचे मुकुट मला आता नको असे मी पक्ष श्रेष्ठीना सांगून देखील त्यांनी कोणतेच लक्ष दिले नाही. त्यामुळे मी १ सप्टेंबर रोजी पक्षातील माझ्या सहकाऱ्यासोबत चर्चा करून पक्षाच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
शहरात राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते वाढवत आहेत असा समज पसरवला जात आहे. आगामी पालिकेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्य व जिल्हा पातळीवरील राजकीय समिकरणांचा विचार न करता कोणतीच पावले खेड शहरात राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांकडून उचलली जात नसल्याची खंत चिकणे यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्ष सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षातुन आगामी कालावधीत काम करणार हे आपले राजकिय मित्र व कुटुंबियांसोबत आजच चर्चा करून जाहीर करणार असल्याचे श्री चिकणे यांनी यावेळी सांगितले.