काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार रवींद्र धंगेकर, सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी उप महापौर आबा बागुल, प्रवक्ता गोपाळ तिवारी, महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी, प्रदेश कमिटी यशराज पारखी, मुखेश धिवार, राजू नागेंद्र कांबळे, मनोज पवार, संग्राम खोपडे (RJ bandya) अशी इच्छुक उमेदवारांची नाव आहेत.
पुणे लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी पाहायला मिळत होती. उमेदवारीबाबत मोठी चुरस असल्याने शह-काटशहाचं राजकारण सुरू होतं. शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ज्येष्ठ नेते मोहन जोशी आणि जाएंट किलर आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यस्ती करत सर्व्हेमध्ये ज्या उमेदवारीची बाजू उजवी असेल त्यांना घरपोहोच तिकीट दिलं जाईल, असं जाहीर केल्याने संभाव्य वाद तूर्तास टळलेला पाहायला मिळतोय. मात्र पक्षांतर्गत कुरघोड्या सुरूच आहेत.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, “शहर काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेस कमिटीला सांगत असते की शहरातून किती उमेदवार इच्छुक आहे. त्या सर्व्हेनुसार आज २० नावे प्राप्त झाली आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते ज्या उमेदवारचं नाव निश्चित करेल, त्यासाठी पुणे शहर कमिटी काम करेल. पुणे लोकसभेची जागा ज्या पक्षाकडे येते त्याच पक्षाची केंद्रात सत्ता असते. आम्ही ही जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करू. संविधान वाचवण्यासाठी सगळे मिळून काम करू”