राजू शेट्टी आमदार होणार की नाही?; जयंत पाटील म्हणाले…

हायलाइट्स:

  • जयंत पाटील जळगाव दौऱ्यावर; अतिवृष्टीग्रस्त भागांची केली पाहणी
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका
  • राजू शेट्टींच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबतही केला खुलासा

जळगाव: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत आहे. सत्तेत असलेल्या राज्य सरकारने शिफारस केलेली नावे तपासून त्यावर राज्यपालांनी निर्णय देणे अपेक्षित असते. मात्र, राज्यपाल लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत, असे महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना वाटायला लागले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. (Jayant Patil Criticises Bhagat Singh Koshyari)

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्री जयंत पाटील आज शनिवारी चाळीसगावच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जंयत पाटील पुढे म्हणाले, राज्य सरकारने शिफारस केलेल्या १२ जणांच्या नावांबाबत राज्यपालांनी आता लवकर निर्णय घ्यायला हवा, अशी आमची मागणी आहे. यापूर्वी जी यादी राज्य सरकारने राज्यपालांना सादर केली आहे, त्यातून कोणाचेही नाव वगळलेले नाही. आम्ही पुन्हा एकदा राज्यपालांना या विषयाबाबत विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळं राजू शेट्टी यांचं नाव वगळण्यात आलं नसल्याचं पाटील यांनी एकप्रकारे सूचित केलं.

देशमुख व खडसेंच्या पाठीशी राष्ट्रवादी

ईडी व सीबीआय यासारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणणे, त्यांना धमकावणे आणि त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना त्यांची बदनामी करण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे. हे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे व अनिल देशमुख यांच्यामागे पूर्ण ताकदीनिशी उभी आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटलांचा चाळीसगाव दौरा ; केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी

निवडणुकांपूर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, अशी राष्ट्रवादीची देखील भूमिका आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसचीही हीच भूमिका आहे. या विषयासंदर्भात सर्वपक्षीय मंत्री व नेत्यांची नुकतीच बैठक देखील झाली. त्यात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी चर्चा झाली आहे. त्यामुळे आता या विषयासंदर्भात कोणी वेगळी घोषणा करण्याची गरज नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

हेही वाचा:

‘सरकार तीन पक्षांचं असलं तरी शिवसेना सगळ्यांच्या वर’

‘गोपीचंद पडळकर हे नुकतंच उगवलेलं गवत; ते स्वत:ची मुळं शोधतंय’

Source link

Jayant Patil Criticises Bhagat Singh KoshyariJayant Patil In JalgaonJayant Patil News TodayJayant Patil on Raju Shetti Candidatureजयंत पाटीलराजू शेट्टी
Comments (0)
Add Comment