क्रिकेट खेळताना खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागला, काहीच वेळात क्रिकेटरचा मृत्यू

म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबई: भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत एका मैदानावर एकाच वेळी स्थानिक क्रिकेटचे अनेक सामने होत असतात. अशाच पद्धतीने क्रिकेट खेळत असताना दुसऱ्या सामन्यातील फलंदाजाने मारलेला चेंडू डोक्याला लागून एका क्षेत्ररक्षकाचा सोमवारी मृत्यू झाला.

गुजराती कच्छी समाजाने माटुंगा येथे प्रौढ क्रिकेटपटूंची स्पर्धा आय़ोजित केली होती. त्यात ५० वर्षांवरील खेळाडूंचा सहभाग होता. यामध्ये जयेश सावला (५२) हे दादर युनियन खेळपट्टीवर खेळत होते. क्षेत्ररक्षण करताना त्यांची पाठ दादर पारसी खेळपट्टीवर सुरू असलेल्या सामन्याकडे होती. याच खेळपट्टीवरील खेळाडूने मारलेला चेंडू सावला यांच्या डोक्याला कानाच्या मागील बाजूस लागला. त्यांना तातडीने लायन ताराचंद रुग्णालयात नेण्यात आले. तिथे सोमवारी संध्याकाळी ५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

क्रिकेटवेड्या मुंबईत मैदाने कमी होत असताना खेळपट्ट्या अधिकाधिक जवळ येत आहेत. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातील चेंडू लागून खेळाडूंना दुखापत होणे, हे नेहमीचेच झाले आहे. मात्र क्षेत्ररक्षण करताना क्रिकेटपटूचे निधन झाल्याची ही बहुदा पहिलीच घटना असावी, असे मुंबईतील क्रिकेट अभ्यासकांचे मत आहे.

अशा घटना टाळण्यासाठी…

मुंबईत क्रिकेट सामने आजूबाजूलाच होत असल्यामुळे खेळाडू जायबंदी होण्याचा धोका जास्त असतो. हे टाळण्यासाठी दोन खेळपट्ट्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे आवश्यक आहे. हे शक्य नसल्यास एकमेकांनजीक सामने होत असलेल्या संघांतील कर्णधार व पंचांनी सामना सुरू होण्यापूर्वी समन्वयासाठी चर्चा करावी. त्यानुसार ‘अ’ सामन्यातील चेंडू टाकला जाईपर्यंत ‘ब’ सामन्यात काहीही खेळले जाणार नाही. ‘अ’ सामन्यातील चेंडूवर सर्व अॅक्शन पूर्ण झाल्यावर ‘ब’ सामन्यातील चेंडू टाकला जाईल, अशा पद्धतीने खेळायला हवे. अर्थात, हे वेळखाऊ आहे; पण त्याची भरपाई ड्रिंक्स आणि उपाहाराची वेळ कमी करून करता येईल. यांसारखे काही बदल केल्यास मुंबईच्या मैदानातील क्रिकेट काही प्रमाणात सुरक्षित होऊ शकेल, असे मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी खजिनदार जगदीश आचरेकर यांनी सुचवले.

हार्वर्ड रिटर्न, AI एक्सपर्ट टॉप-१०० लिस्टमध्ये नाव; कशी पकडली गेली पोराची हत्या करणारी सूचना सेठ?
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

ball hits headcricket newscricketer died during matchmumbai cricket newsmumbai live newsMumbai news today
Comments (0)
Add Comment