जन्मदिवस साजरा करण्यासाठी लॉजवर आलेल्या तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई शहरात घडली आहे. हत्येनंतर प्रियकर पळून जात असताना तो साकीनाका पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी लॉजवर जाऊन पाहणी केली असता हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला.
खैरणे एमआयडीसीमधील अश्विन लॉजमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी सोहेब कलाम शेख (वय २४ वर्षे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो साकीनाक्याचा राहणारा असून, अमितकौर रणधीर सिंग वीग (वय ३५ वर्षे) नावाच्या महिलेसोबत लॉजवर आला होता. अमित कौरचा वाढदिवस होता. दोघेही अश्विन लॉजवर आले होते. त्यानुसार, रात्री दोघांनी एकत्र केकदेखील कापला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि सोहेब याने गळा आवळून अमित कौरची हत्या केली, तर मृतदेह त्याच खोलीत ठेऊन रात्रीच्या वेळी त्याने लॉजमधून पळ काढला. दरम्यान, लॉजमधील कामगारांना त्याची कसलीही कल्पना नव्हती.
घटस्फोटित असलेली अमित कौर ही एका बँकेत मॅनेजर म्हणून कामाला होती. हे दोघेही खैरणे एमआयडीसीतील अश्वीनी लॉजिंगमध्ये गेले होते. यादरम्यान सोहेबने अमितची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर घाबरलेल्या सोहेबने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या मित्राला दिल्यानंतर याची कुणकुण पोलिसांच्या खबऱ्याला लागली. खबऱ्याच्या माहितीच्या आधारे साकीनाका पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक वाल्मीक कोरे आणि त्यांच्या पथकाने परराज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सोहेब शेख याला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास साकीनाका जंक्शन येथून ताब्यात घेतले. दरम्यान, हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News