आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे शिवसेना ठाकरे गट-काँग्रेस – राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीमध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेच्या जागेवरुन दावे-प्रतिदावे सुरु असतांनाच आता भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमध्ये देखील जळगाव लोकसभेच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे राजकारण तापले आहे. तत्कालीन शिवसेना- भाजप युतीमध्ये जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर दोन्ही जागा भाजपाकडेच होत्या. जळगाव व रावेर दोन्ही ठिकाणी सध्या विद्यमान खासदार भाजपाचे आहेत.
शिंदे गटाचा जळगाववर दावा
जळगाव जिल्हा शिंदे गटाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जळगाव लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात आला. जळगाव मतदारसंघात भाजपापेक्षा शिवसेना शिंदे गटाची ताकद जास्त आहे. सर्वाधिक आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्त्यांची फळी मोठी आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आम्हालाच हवा आहे, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी करु, ते भाजपच्या श्रेष्ठींशी बोलतील असे सांगून शिंदे गटाचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी या मतदारसंघावर दावा ठोकला.
भाजप म्हणते ‘जळगाव’वर दावा नव्हे आमचा हक्क
दुसरीकडे मागील अनेक वर्षांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघात विजयी होणाऱ्या भाजपाने ‘जळगाव’ लोकसभेवरील दावा सोडण्यास सपशेल नकार दिला आहे. ‘जळगाव’ मतदारसंघावर दावा नव्हे तर आमचा हक्क असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी ‘मटा’ शी बोलतांना स्पष्ट केले आहे. केवळ विधानसभेच्या ताकदीवरुन शिंदे गट दावा करीत असला तरी मतदारसंघावर एकंदरीत पकड भाजपाची आहे. त्यामुळे जिल्हा नेते गिरीश महाजन व वरिष्ठ नेते याबाबत योग्य निर्णय घेतील असेही जळकेकर म्हणाले.