कोण पात्र, कोण अपात्र? शिवसेनेच्या आमदारांचे आज ठरणार भवितव्य; अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्याच्या राजकारणात उलथापालथ करणाऱ्या आणि गेले दोन वर्षे आरोप प्रत्यारोप, न्यायालयीन लढाई व विधिमंडळाच्या पातळीवर संघर्षस्थितीत असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज, बुधवारी बहुप्रतीक्षित निकाल जाहीर करणार आहेत. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आमदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारचा दिवसही राजकीय घडामोडींचा ठरला. निकालापूर्वी नार्वेकर आणि शिंदे यांच्या झालेल्या भेटीमुळे विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला असून, हा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारीही पोहोचला आहे.

याचिकांवर सुनावणी

राज्यात २०२२ मध्ये घडलेल्या अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून होणाऱ्या पात्र-अपात्रतेच्या दाव्यांवर आज, बुधवारी निर्णय अपेक्षित आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आली होती. विधानसभाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने वारंवार सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. विविध वादंगांनंतर १४ सप्टेंबरपासून नार्वेकर यांनी याचिकांवर सुनावणी सुरू केली. या सुनावणीत आमदारांच्या अपात्रेसाठी एकूण ३४ याचिका विधानसभा अध्यक्षांसमोर दाखल झाल्या होत्या. या सर्व ३४ याचिकांची सहा गटांमध्ये विभागणी करून सुनावणी घेण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष, नार्वेकरांच्या निर्णयाची प्रतीक्षा, शिवसेनेचे ते १६ आमदार नेमके कोण? वाचा यादी
निकाल राखला

२० डिसेंबरला याबाबत अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेनुसार मुदतीच्या अखेरच्या दिवशी, म्हणजेच आज, बुधवारी विधानसभाध्यक्ष निकाल देणार आहेत. जवळपास ४०० ते ५०० पानांचे निकालपत्र तयार करण्यात आले असून याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे घेऊन निकालाचा सारांश विधानसभाध्यक्ष वाचून दाखवणार आहेत. साधारण ५ ते १० पानांचा सारांश निकाल असणार आहे. निकालाची मूळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना पाठविली जाणार असून या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचा बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

‘न्यायमूर्ती-आरोपीची भेट’

‘निकाल देणारे न्यायमूर्ती म्हणजेच विधानसभाध्यक्ष हे आरोपीला अर्थात मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटत आहेत. एक वेळा नाही, तर दोन वेळा त्यांची भेट झाली. येथे न्यायमूर्तीच आरोपीची भेट घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कोणत्या निकालाची आणि न्यायाची अपेक्षा करायची,’ असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केला. नार्वेकर-शिंदे भेटीवर आक्षेप घेत यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

‘मतदारसंघातील कामासाठी भेट’

‘आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील कामे असतात. मुख्यमंत्र्यांसोबत माझी बैठक ३ तारखेला नियोजित होती. पण मला करोनाची लागण झाल्याने मी त्यांना भेटू शकलो नाही. कुलाब्याच्या पुलाबाबत मला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची होती. तसेच दक्षिण मुंबईतील आठ रस्त्यांचा मुद्दा होता. हे सर्व विषय घेऊन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो,’ असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

‘अपात्रतेचा निकाल गुणवत्तेवर लागेल’

‘लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. लोकसभा आणि विधानसभेत पहिल्या दिवसापासून आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले आहे. आमचे सरकार नियमानुसार आणि घटनेनुसार स्थापन झाल्याने आमदार अपात्रतेचा निकाल गुणवत्तेवर लागले,’ असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला.

मोदींनी लक्षद्विपला जाऊन फोटोसेशन केलं आणि मालदीवच्या महागड्या पर्यटनाचं दुकान गोत्यात आलं

Source link

rahul narvekarshiv sena mla disqualifiedshiv sena mla disqualified resultuddhav thackeray-eknath shindeउद्धव ठाकरे एकनाथ शिंदेराहूल नार्वेकरशिवसेना अपात्र आमदारशिवसेना आमदार अपात्र निकाल
Comments (0)
Add Comment