यावेळी संजय राऊत यांनी आक्रमक शैलीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाबाबत घराणेशाहीचा आरोप करणारी एकनाथ शिंदेंकडून केली जाणाऱ्या टीकेचा प्रतिवाद केला. श्रीकांत शिंदे यांची ओळख त्यांच्या लोकसभा मतदारसंघात सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे यांचा मुलगा अशीच होती. सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी माझा मुलगा म्हणूनच त्याच्यासाठी मतं मागितली ना? तोपर्यंत शिवसेनेसाठी आणि त्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या मुलाचं काय योगदान होतं?, असा बोचरा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं. बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेचंही आणि लोकसभेचंही. निवडणूक आयोगाने खरी शिवसेना आम्ही असल्याचं मान्य केलंय. एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याचं आजच्या निकालावरून दिसतंय. “कोणीही आपल्याला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. लोकशाहीत एखाद्या पक्षाचा प्रमुख मनमानी करत असेल तर पक्षातील इतर सहकाऱ्यांना त्याच्याविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. अशावेळी दहाव्या परिशिष्टातील तरतुदी लागू होत नाहीत. त्यामुळे पक्षप्रमुख किंवा पक्षाध्यक्ष यांचं एकट्याचं मत संपूर्ण पक्षाचं मत असू शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष एकट्या माणसाची खासगी मालमत्ता होऊ शकत नाही असा निर्णय अध्यक्षांनी दिला आहे” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली होती.