प्रत्यारोपणासाठी गळून गेली धर्माची बंधने…हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झाले एकमेकांच्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण

मुंबई : एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचा धर्म, जात आड येऊ नये, असे म्हणतात. याचेच प्रत्यंतर नुकतेच मुंबईत बघायला मिळाले आहे. एका हिंदू आईने आपला मुलाचा जीव वाचवण्यासाठी मुस्लिम रुग्णाला मूत्रपिंड दान केले आहे. तर, त्या मुस्लिम रुग्णाच्या पत्नीने या हिंदू रुग्णाला मूत्रपिंड दान करून अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.

वर्षभरापूर्वी कल्याणचा रहिवासी असणारा रफिक शाह आणि घाटकोपस्थित आयुर्वेदिक डॉक्टर राहुल यादव यांची परळच्या केईएम रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये भेट झाली. बुधवारी मात्र जेव्हा त्यांनी हे रुग्णालय सोडले तेव्हा त्यांच्यात एक अनोखे बंध निर्माण झाले होते. रफिक शाह (४८) यांना यादवची आई गिरिजा यांनी दान केलेले मूत्रपिंड मिळाले तर, २७वर्षीय डॉक्टरना शाह यांची पत्नी खुश्नुमा यांनी दान केलेले मूत्रपिंड मिळाले. अशाप्रकारे भिन्नधर्मियांमधले एक अनोखे प्रत्यारोपण १५ डिसेंबर रोजी पार पडले.

‘अशा प्रकारे भिन्नधर्मियांमधील मूत्रपिंड अदलाबदली प्रत्यारोपणाच्या (स्वॅप ट्रान्सप्लांट) घटना याधीही घडल्या आहेत,’ असे केईएम रुग्णालयाच्या मूत्रपिंडविकार विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम जमाले यांनी सांगितले. जेव्हा एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचा आणि रुग्णाचा रक्तगट सारखा नसल्याने तो जेव्हा रुग्णाला मूत्रपिंड देऊ शकत नाही, तेव्हा अशा प्रकारे दोन रुग्णांच्या नातेवाइकांची मूत्रपिंडे एकमेकांच्या रुग्णांना दिली जातात. मूत्रपिंडविकार विभागाकडे असलेल्या या यादीत शाह आणि यादव यांच्या बाबतीत असे मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊ शकते, असे आढळले आणि एकमेकांच्या नातेवाइकांनी त्याला होकार दिला.

कल्याणमध्ये सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरकडे काम करणारा रफिक शहा याचे मूत्रपिंड दोन वर्षांपूर्वी निकामी झाले. तिथपासूनच खुश्नुमा (३८) हिला पतीसाठी मूत्रपिंड दान करायचे होते. मात्र तिचा रक्तगट ‘ए पॉझिटिव्ह’ होता. तर, तिच्या पतीचा रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ होता. तीच परिस्थिती गिरिजा यांच्याबाबतही होती. त्यांनाही त्यांच्या २७ वर्षीय मुलाचा जीव वाचवायचा होता. अशोक हा सात वर्षांचा असातनाच, त्याच्यात मूत्रपिंडविकार असल्याचे पहिल्यांदा लक्षात आले होते. परंतु त्यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह होता आणि त्याचा ए पॉझिटिव्ह. ‘आम्ही दोघा कुटुंबीयांना मार्गदर्शन केले. ते एक चांगले निरोगी दाते होऊ शकतात, हे माहीत होईपर्यंत ते दुःखात होते,’ असे जमाले सांगतात.

प्रत्यारोपण सर्जन डॉ. सुजाता पटवर्धन यांनी त्यांच्या युरोलॉजी पथकासह १६ डिसेंबर रोजी चार शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. ‘प्रत्यारोपणासाठी कोणतेही बंधन नसते,’ असे पटवर्धन सांगतात.

योगायोगाची बाब म्हणजे देशातील अशा प्रकारचे स्वॅप ट्रान्सप्लांट सन २००६मध्ये हिंदू आणि मुस्लिम व्यक्तींमध्येच झाले होते. त्यानंतर अशा प्रकारे भिन्नधर्मियांमधील स्वॅप ट्रान्सप्लांट जयपूर, चंडिगड आणि बेंगळुरूमध्ये झाले आहेत.

यादव यांचे वडील अशोक हे घाटकोपरमध्ये रिक्षा चालवतात. त्यांचा मुलगा राहुलला मूत्रपिंडाचा विकार होता, याचे एकमेव लक्षण होते ते म्हणजे त्याचे असणारे मोठे पोट. त्याच्यावर तो गेल्या तीन वर्षांपर्यंत वैद्यकीय उपचार घेत होता. त्यानंतर मात्र त्याला डायलिसिस करावे लागले. तरीही त्याने त्याच्या अभ्यासात खंड पडू दिला नाही आणि तो डॉक्टरही झाला, असे त्याचे वडील सांगतात. तर, शाह हे दोन वर्षांपूर्वी आजारी पडले. आता मात्र त्यांचे प्ररत्योरापण झाल्यामुळे त्यांचे सारे कुटुंबीय आनंदी आहेत, असे शाह यांची मुलगी सांगते.

असे असले तरी वजनाच्या समस्येमुळे दोघेही अजून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. यादव यांना बुधवारी रुग्णालयातून सोडण्यात आले. मात्र शाह यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच राहावे लागेल, असे डॉक्टर सांगतात. या दोघांच्या कुटुंबीयांनी अद्याप एकमेकांच्या घरी भेट दिलेली नाही. मात्र या दोघांनीही एकमेकांना मौल्यवान भेट दिली आहे.

आम्ही जवळपास एक वर्ष कागदपत्रांचे सोपस्कार आणि रक्ताच्या चाचण्यांमध्ये व्यग्र होतो. आता आम्ही खऱ्या अर्थाने एक कुटुंब झालो आहोत, असे अशोक सांगतात.

Source link

mumbai newsrare interfaith kidney swaptransplant knows no boundariesप्रत्यारोपणमूत्रपिंडाचे प्रत्यारोपणहिंदू आणि मुस्लिम प्रत्यारोपण
Comments (0)
Add Comment