गेल्या एक जानेवारीपासून सुरु असलेला संप रेशनदुकानदारांनी गुरुवारी अखेर मागे घेतला. वाढीव कमिशन देण्यात यावे, यासह अन्य मागण्याबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने तुर्तास संप स्थगित करण्यात आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डी.एन. पाटील यांनी दिली.
प्रलंबित मागण्याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही त्याबाबत शासन ठोस निर्णय घेत नसल्यामुळे ऑल इंडिया फेयर र्प्राइज शॉप डिलर्स फेडरेशनने नेतृत्वाखाली एक जानेवारीपासून या संपाला सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. संपाची दखल घेत केद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रास्तभाव दुकानदारांची बैठक घेत वरिष्ठांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन ९ जानेवारी रोजी दिले होते. त्यानंतर बुधवारी ( १० जानेवारी) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. वरिष्ठ अधिकारी त्यस उपस्थित होते.
संघटनेच्या मागण्याबाबत यावर चर्चा झाली. कमिशन वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे सादर करण्यात आलेला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच धान्य मोजुन देणे, ४ – जी ई पॉज मशिन देणे, कमिशनची रक्कम प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत परवानाधारकाच्या खात्यावर जमा करणे याबाबत शासनाकडून ठोस आश्नासन महासंघाला देण्यात आले. त्यामुळे एक जानेवारीपासून पुकारण्यात आलेला हा बेमुदत संप तुर्तास स्थगित करण्यात आला तसेच दिल्ली येथे १६ जानेवारी रोडी नियोजित मोर्चा देखील स्थगित करण्यात आल्याचे पाटील यांनी पत्रकाद्वारे नमूद केले.