त्यानंतर एकाच्या घरातून १५ चक्री जप्त करण्यात आल्या आहेत. छुप्या पद्धतीने विक्री होत असलेला नायलॉन मांजा पकडण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मटाने या विषयावर प्रकाश टाकून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मांजाचा ‘गळा’ कोण आवळणार ? या आशयाचे वृत्त प्रकाशित करून मटाने शहरात होत असलेल्या नायलॉन मांज्याच्या अवैध वापरावर प्रकाश टाकला होता. अनेकांचे जीव जाऊनही कठोर कारवाई होत नसल्याची चिंताही या वृत्तात व्यक्त करण्यात आली होती.
‘पतंग उडविण्याचा आणि दुसऱ्याची पतंग काटण्याचा आनंद मोठा असला तरी… यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाने अनेकांचे बळी घेतले. मुख्या प्राण्यांसह पक्षीही जखमी होऊन तडफडत मृत्युमुखी पडतात. त्यामुळे मी पतंग उडवितांना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही आणि माझ्या परिसरामध्ये कुणालाही नायलॉन मांजाचा वापर करू देणार नाही’ अशी शपथ नुकतीच नागपूर महापालिकेच्यावतीने नागपूरकरांना देण्यात आली होती.
नायलॉन मांज्या विक्री होत असल्याची माहिती वाइल्ड लाइफ वेलफेअर सोसायटीला (डब्ल्यूडब्ल्यूएस) मिळाल्यानंतर पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. नायलॉन मांजा विकत घ्यायचा असल्याचे दोन युवकांना सांगण्यात आले. त्यांनी अयोध्यानगर साई-मंदिर परिसरात बोलावले. ‘डब्ल्यूडब्ल्यूएस’चे सदस्य अर्ध्या तासापासून वाट बघत थांबले होते. त्याचवेळी पोलिसही दबा धरून बसले होते. मांजा विक्री करणाऱ्याने पाऊण तासाने येत मोपेडमधून मांजा काढून दिला. पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले. पुढील तपास सुरू आहे, पोलिसांकडून सांगण्यात आले.