तलाठी भरती आरोप : नाहक बदनामी करतायेत, रोहित पवारांवर कारवाई करणार : विखे

अहमदनगर : तलाठी भरती प्रक्रियेसंबंधी सरकारवर निराधार आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. यावरून टीका करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भरतीत गैरप्रकाराचा आरोप करून आपल्यावर कारवाई करावीच, असे आव्हान दिले होते. ते आव्हान विखे पाटील यांनी स्वीकारले आहे. आपल्या कारवाईच्या इशाराच्या पुनरुच्चार करताना विखे पाटील म्हणाले, तलाठी भरतीमध्ये ३० लाख रुपये घेतल्याचे बेछूट आरोप करणारे आमदार रोहित पवार यांनी सरकारची व संबंधित विभागाची बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई निश्चित केली जाणार आहे. याबाबत कायदेशीर मत मागवले आहे.

दक्षिण नगर जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यासाठी मंत्री विखे आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार यांनी तलाठी भरतीवर आक्षेप घेतला आहे व त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मंत्री विखेंनी दिला होता. तर अशी कारवाई करण्याचे आव्हान रोहित पवार यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर, बोलताना मंत्री विखे यांनी रोहित पवार यांच्यावर कारवाईचा पुनरुच्चार केला.

विखे पाटील म्हणाले, रोहित पवार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत राज्याच्या विधी खात्याच्या तज्ज्ञांकडून मत मागवले आहे. तलाठी भरतीसाठी ३० लाख रुपये घेतल्याचा बेछूट आरोप पवार यांनी केला आहे. खरेतर स्वतःच्या कारभाराचे काय दिवाळे निघाले व जनतेच्या पैशांची कशी लूट केली, याचा हिशेब त्यांनी द्यायला हवा. अर्थात त्यांच्यावरील ईडी कारवाईने हा हिशेब समोर येईलच. पण बेछूट आरोप करून सरकारची व महसूल विभागाची बदनामी केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई निश्चित होणार आहे.

तलाठी भरतीमध्ये कोठेही गोंधळ झालेला नाही वा कोठे विसंवादही नाही. निःस्पृह, निष्पक्ष व पारदर्शी पद्धतीने निकाल जाहीर झाला आहे. गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी विनाकारण मुलांमध्ये बुद्धीभेद करू नये, असे आवाहन विखे पाटील यांनी केले.

मंत्री विखे म्हणाले, या परीक्षेबाबत श्वेतपत्रिका काढायला आम्हाला काहीच अडचण नाही व भीतीही नाही. पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो सावळा गोंधळ सुरू होता, कोविड काळातील व लवासा प्रकरणातील भ्रष्टाचार सुरू होता, त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ही मागणी आहे. प्रत्येक योजना पारदर्शी पद्धतीने राबवणारे आमचे सरकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पेपर फुटी वा भरतीबाबत सुचवल्या जाणार्‍या सुधारणांचे स्वागत केले जाईल, असेही विखे पाटील म्हणाले.

Source link

radhakrishna vikhe patilRohit Pawartalathi bharativikhe patilतलाठी भरतीराधाकृष्ण विखे-पाटीलरोहित पवार
Comments (0)
Add Comment