केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने शुक्रवारी नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. मोदी १९ सप्टेंबर २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला नाशिकमध्ये आले होते. त्यानंतर प्रथमच ते नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या स्वागतासाठी नाशिकनगरीला सहस्र दिवे आणि रोषणाई करण्यात आली आहे. मोदींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या, तसेच रंगरंगोटी करण्यात आली असून, प्रभू श्रीरामाची नगरी पूर्णपणे भगवी करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणाही नाशिकला सजवण्यासाठी राबत आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मोदी लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडणार आहेत. मोदी रोड शो, काळाराम मंदिराचे दर्शन, गोदाकाठाची पाहणी करणार असून, सभेलाही संबोधित करणार आहेत. त्यामुळे भाजपने मोदींच्या स्वागताला संपूर्ण शहरच भगवेमय केले आहे. या दौऱ्यातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने शक्तिप्रदर्शनाची पूर्ण तयारी केली आहे. मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्यातील डझनभर मंत्री या सोहळ्याला हजर राहणार आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी केंद्रीय, तसेच राज्य राखीव दलाचे हजारो जवान नाशिकमध्ये दाखल झाले असून, पूर्वसंध्येला मोदींच्या दौरा मार्गाची पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली आहे.
असा आहे मोदींचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर सकाळी दहाला आगमन होणार आहे. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने निलगिरी बाग येथे दाखल होतील. त्यानंतर हॉटेल मिरचीपासून त्यांच्या रोड शोला सुरुवात होईल. हा रोड शो तपोवनातील सिटीलिंक कार्यालयापर्यंत असेल. त्यानंतर थेट काळाराम मंदिराचे दर्शन आणि आरतीला ते हजेरी लावतील. आरतीनंतर थेट रामकुडांची पाहणी करतील. मोदी तपोवनातील सभास्थळी सकाळी साडेअकराला दाखल होणार आहेत. सभेनंतर निलगिरी बाग येथून हेलिकॉप्टरने थेट ओझर विमानतळाकडे प्रयाण करतील.
प्रलंबित प्रकल्पांना मिळणार चालना!Ḥ
पंतप्रधान पाच वर्षांनंतर नाशिकला येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्री नाशिकमध्ये प्रथमच एकाच व्यासपीठावर येत असल्याने, नाशिकच्या विकासाचा वनवास संपण्याची आशा निर्माण झाली आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिक कॉरिडॉर, निओ मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प, सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासह प्रलंबित प्रकल्पांना चालना मिळण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीसह निओ मेट्रो आणि त्र्यंबक-नाशिक कॉरिडॉरची घोषणा मोदींकडून व्हावी, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.
अशी आहे सुरक्षाकुमक
विशेष सुरक्षा दलाचे ४४ कमांडो
अतिरिक्त पोलिस संचालक – १
विशेष पोलिस महानिरिक्षक – ४
पोलीस आयुक्त – १
पोलिस उपायुक्त – १४
सहाय्यक आयुक्त – ७
पोलिस निरिक्षक,उपनिरीक्षक – ८००
पोलिस कुमक – २०००
अतिरिक्त पथके – राज्य गुप्तवार्ता विभाग, विशेष सुरक्षा विभाग, जलद प्रतिसाद पथकांचा समावेश