एका खोलीत कोंडून अमानुष मारहाण
जव्हारमधील गणेश नगर आणि मोखाडा येथील पळसवाडी कातकरी वाडी येथून या मजुरांना ऊसतोडणीसाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात एकंबे गावात नेले होते. तिथे मालकाकडून दररोज मारहाण, अत्याचार सुरू होते. याला कंटाळून काही मजुरांनी तेथून पळ काढला होता. त्यावेळी कृष्णा नडगे याला दोन मालकांनी पाच दिवस साखर कारखान्यातील एका खोलीत कोंडून अमानुष मारहाण केली होती. हे सांगताना कृष्णा आणि त्याच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. १२ वेठबिगार मजूर आणि त्यांची १४ मुले यांची श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी ९ जानेवारी रोजी मुक्तता केली.
श्रमजीवी संघटनेच्या सीता घटाळ, संतोष धिंडा, अंकुश वड, अजित गायकवाड, ईश्वर भांबरे आणि रवी वाघ या पदाधिकाऱ्यांनी सातारा येथे जाऊन या मजुरांची सुटका केली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि पोलिस अधीक्षक समीर शेख यांचेही सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
गैरहजेरीत धान्याची उचल?
या सर्व पीडित वेठबिगारी मजुरांच्या स्थलांतरकाळात त्यांचे रेशनचे धान्य उचलल्याचे पंडित यांनी निदर्शनास आणून दिले असता, पुरवठा विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या नोंदी तसेच शिक्षण हमी कार्डबाबत समर्पक उत्तर न मिळाल्याने पुरवठा आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित कागदपत्र घेऊन येण्याचे निर्देश पंडित यांनी दिले. ज्या मुलांचे शिक्षण सुटले आहे, त्यांना तात्काळ जवळच्या आश्रमशाळेत दाखल करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी नेहा भोसले यांना दिल्या.