‘राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आपलाही दावा कायम आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चेनंतर कोण उमेदवार असेल ते ठरविले जाईल,’ असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. या वक्तव्यावरून महायुतीत बेबनाव होण्याची शक्यता आहे. भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, कार्याध्यक्ष गोरख बोडके, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, माजी आमदार शिवराम झोले, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, महिला निरीक्षक शोभा पगारे, महिला शहराध्यक्षा योगिता आहेर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष गौरव गोवर्धने, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, चेतन कासव, संजय खैरनार, महिला पदाधिकारी कविता कर्डक, मेघा दराडे, समीना मेमन, सुनीता शिंदे, जगदीश पवार, युवती जिल्हाध्यक्षा किशोरी खैरनार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भुजबळ उवाच…
-राज्यातील महायुतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १४) मनोमिलन बैठकी
-पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकींत व्हावे सहभागी
-नाशिकवर आपल्या पक्षाचाही दावा, कुठली जागा कुणाला ते लवकरच कळेल
-महायुतीतील कुणालाही संधी मिळाली, तरी उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे
-आगामी वर्ष निवडणुकांचे, पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे
-नूतन पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणी निर्मितीस द्यावे प्राधान्य
-पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचवावे, उपक्रमांद्वारे जनजागृती करावी
-शहरासह ग्रामीण भागात पक्षाची संपर्क कार्यालये सुरू करावीत
‘आपल्याला धोका नाही!’
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील निकाल कायद्याच्या कसोटीवर लागला आहे. सर्वाधिक लोक ज्यांच्याकडे गेले त्यांच्या बाजूने निकाल लागला आहे. आपल्या पक्षाच्या केसमध्ये मात्र कुठलाही संभ्रम नाही. आपला पूर्वीचाच ‘व्हीप’ कायम असल्याने आपली बाजू भक्कम असून, आपल्याला धोका नसल्याचा दावा भुजबळ यांनी यावेळी केला. सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांद्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून, या प्रश्नावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.