काहीही करून महाड जिंकायचं, ठाकरेंनी चंग बांधला, निकालाच्या तिसऱ्याच दिवशी उमेदवार ठरवला!

मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर एका बाजूला ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंनी विधानसभा निहाय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज महाड विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली.

महाड विधानसभेचे आमदार भरत गोगावले आहेत. ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. भरत गोगावले सातत्याने थेट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतायेत. त्यापार्श्वूमीवर कोणत्याही परिस्थितीत भरत गोगावले यांचा पराभव करायचा आणि ही जागा जिंकायचीच असा चंग उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे.

त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयाच्या तिसऱ्या दिवशीच महाड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महाडमधून स्नेहल जगताप यांना भरत गोगावले यांच्या विरोधात मैदानात उतरवणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने दिली.

स्नेहल जगताप कोण आहेत?

स्नेहल जगताप या महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. तसेच त्या महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा आहेत. त्यांनी मे २०२३ मध्ये काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समोरच महाड विधानसभा मतदासंघात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचाच आमदार निवडून जाईल, असं वक्तव्य स्नेहल जगताप यांनी केलं होतं.

त्यानंतर अनंत गिते यांच्यासोबत स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बूथ स्तरावर मोर्चेबांधणी करून सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याविषयी उद्धव ठाकरे यांनी स्नेहल जगताप आणि रायगडमधील पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. तसेच कोणत्याही परिस्थितीत भरत गोगावले यांचा पराभव करायचा आहे. त्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी स्नेहल जगताप आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आक्रमक आणि चाणाक्ष असलेल्या जगताप यांना उमेदवारी देऊन गोगावलेंचा पराभूत करण्याचा ठाकरेंचा मानस आहे.

Source link

bharat gogawalemahad vidhansabha electionsnehal jagtapUddhav Thackerayउद्धव ठाकरेभरत गोगावलेमहाड विधानसभास्नेहल जगताप
Comments (0)
Add Comment