मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणकर बंधूंचे आई-वडील महावितरणमध्ये कार्यरत होते. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून त्यांनी कोराडी येथील सुरादेवी येथे चार एकर जमिनीवर सिमेंटच्या विटा तयार करण्याचे काम सुरू केले. वाळू आणि खडी वाहतूक करण्यासाठी टिप्परही भाड्याने घेण्यात आले. हा व्यवसाय विलासद्वारे पाहिला जात असे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. काही काळ हा व्यवसाय तोट्यात चालला होता. विलासने वडिलोपार्जित मालमत्ता विकून कर्जही घेतले होते.
चंदनने हिशेब विचारल्यावर मृतक विलास हा चंदनसोबत मारहाण करायचा. वडिलोपार्जित मालमत्तेतही हिस्सा विलासने चंदनला दिला नाही. यामुळे चंदनने विलासला मारण्याचा कट रचला. ८ जून २०२३ रोजी रात्री चंदन आणि मनोहर यांनी विलासचा धारदार शस्त्राने खून केला. दुसऱ्या दिवशी शौचालयासाठी खड्डा खोदण्याच्या बहाण्याने जेसीबीचा वापर करून खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरण्यात आला. परिसरामध्ये बाहेरील लोकांची ये-जा नसल्याने घटनेची माहिती कोणालाच मिळाली नाही.
विलास पत्नीलाही मारहाण करायचा. त्यामुळे २०१७ मध्ये त्याची पत्नी त्याला सोडून मुलगा आणि मुलीसह माहेरी राहते. त्यामुळे विलासच्या पत्नीलाही घटनेची माहिती मिळू शकली नाही. गेल्या काही दिवसांपासून विलास अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्याच्याशी संबंधित लोकांनी चंदनशी विलासची चौकशी सुरू केली. मात्र चंदनने अनेकदा उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे विलासचा काही परिचितांनी याची माहिती परिमंडळ ५ चे डीसीपी निकेतन कदम यांच्या पथकाला ही माहिती दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई केली.
एसीपी संतोष खांडेकर यांनी चंदनला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला तो उडवाउडवी करू लागला. मात्र पोलीस कडकपणा दाखवल्यानंतर त्याने मनोहरच्या मदतीने विलासची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढण्याची परवानगी घेतली. त्यानंतर पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत विलासचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले आहे. कोराडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.