डिसेंबर २०१६ मध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाला सुरुवात झाली. सात वर्षांनंतर हा लिंक पूर्ण झाला आहे. साडे चार वर्षांमध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण कोविड, लॉकडाऊनमुळे कामाला उशीर झाला. या लिंकमुळे प्रवासाचा वेळ दोन तासांवरुन थेट २० मिनिटांवर येणार आहे. मुंबई आणि पुण्यातलं अंतर कापण्यासाठी लागणारा वेळदेखील या लिंकमुळे कमी होईल. मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरु बंदर यांना जोडण्याचं कामदेखील लिंक करेल. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलं जात आहे. तिथेही या लिंकमुळे लवकर पोहोचता येईल.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कुठून कुठपर्यंत जाणार?
पूल दक्षिण मुंबईच्या शिवडीतून नवी मुंबईच्या न्हावाशेवाला जोडेल. नवी मुंबई गाठण्यासाठी आधी २ तास लागायचे. या लिंकमुळे तो वेळ २० मिनिटांवर येईल.
पूल किती लांब?
अटल सेतुवर सहा मार्गिका आहेत. पुलाची एकूण लांबी २१.८ किलोमीर आहे. पुलाचा १६.५ किलोमीटर भाग पाण्यावर उभारण्यात आला आहे. तर ५.५ किलोमीटर भाग जमिनीवर आहे. समुद्राच्या तळापासून ४७ मीटर खोदकाम करण्यात आलं आहे.
पूल उभारण्यासाठी किती खर्च?
पुलाच्या बांधकामासाठी १७ हजार ८४० कोटी रुपये खर्च आला. त्यासाठी १ लाख ७७ हजार ९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५ लाख ४ हजार २५३ मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आलं. १०० वर्ष पूल टिकेल असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.
पुलाची वैशिष्ट्यं काय?
समुद्रावर उभारण्यात आलेला देशातला सर्वात लांब पूल अशी त्याची ओळख आहे. त्यावर ऑटोमेटेड टोल कलेक्शन, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम आहे. पूल बांधण्यासाठी जास्त लांबीच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पूल तयार करण्यासाठी जास्त पिलरची गरज भासलेली नाही.
कोणत्या वाहनांना परवानगी?
कार, टॅक्सी, कमी वजनाची वाहनं, मिनी बस, टू एक्सल बस, लहान ट्रक.
कोणत्या वाहनांना नो एंट्री?
दुचाकी, मोपेड, तीन चाकी टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर, कमी वेगानं चालणारी वाहनं, बैलगाडी
टोल किती?
पुलामुळे एकावेळी ५०० रुपयांचं इंधन वाचेल असा दावा आहे. पुलावरुन जाण्यासाठी कारला एका वेळेसाठी २५० रुपये टोल भरावा लागेल. रिटर्न येणार असल्यास ३७५ रुपये टोल द्यावा लागेल.
दैनिक, मासिक पास असणार का?
नियमित प्रवास करणारे दैनिक, मासिक पास काढू शकतात. कारसाठी दैनिक पास ६२५ रुपयांचा असेल. तर मासिक पास १२,५०० रुपयांचा असेल.
वेग मर्यादा किती?
पुलावर १०० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा आहे. पूल चढताना आणि उतरताना ४० किमी प्रतितास वेगमर्यादा असेल.