अटल सेतू सुरू होत असला तरीही प्रवाशांच्या अडचणी कायम असणार आहेत. या सेतूमुळे नवी मुंबईत निघालेले प्रवासी सुसाट वेगात शिवडी गाठतील. पण त्यानंतर त्यांना आपलं इच्छित स्थळ गाठण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. कारण या सेतूला जोडणाऱ्या करणाऱ्या प्रकल्पाचं काम अद्याप अपूर्ण आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडीत उतरणाऱ्या वाहनांना सुसाट वेगात उपनगर गाठता यावं यासाठी एमएमआरडीएकडून शिवडी-वरळी कनेक्टरचं बांधकाम सुरू आहे. पण हे बांधकाम अद्याप ६५ टक्केच झालं आहे. कनेक्टरचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल. सध्या कनेक्टर तयार नसल्यानं नवी मुंबईकडून येणाऱ्या आणि उपनगराच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना दक्षिण मुंबईतील सध्या उपलब्ध असलेल्या मार्गांचा वापर करावा लागेल.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरवरुन दररोज हजारो वाहनं ये-जा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढेल. त्याचा परिणाम वाहतुकीवर होईल. एका सर्वेक्षणानुसार, दोन शहरांमधील अंतर कमी झाल्यानं मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन दररोज जवळपास १ लाख वाहनं ये-जा करतील. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन येणारी १५ टक्के वाहतूक पुढे शिवडी-वरळी कनेक्टरकडे जाईल.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या माध्यमातून केवळ २० ते २५ मिनिटांत मुंबई गाठता येईल. प्रवासाचा वेळ वाचेल. पण शिवडीहून उपनगर गाठण्यासाठी ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागू शकतो. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन येणारी वाहनांना त्याच वेगात वरळी गाठता यावी यासाठी ४.५ किलोमीटर लांब आणि १७.२० मीटर रुंद कनेक्टरचं काम सुरू आहे. ते पूर्ण होण्यास पुढील वर्ष उजाडेल. तोपर्यंत वाहतूककोंडी आणि त्यामुळे मनस्ताप कायम असेल.