खान्देशातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या पूज्य सानेगुरुजी यांची कर्मभूमी अमळनेर शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. तब्बल ७२ वर्षानंतर अमळनेर येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनासांठी खान्देशसह राज्यातील सर्वच साहित्यीक व साहित्यप्रेमींना उत्सुकता आहे. त्यामुळे संमेलनात नोंदणी करण्यासाठी अनेकांनी सुरुवात देखील केली आहे.
संमेलनात केवळ सहभागी होवून उपस्थिती देण्यासाठी कुठलेही शुल्क नसले तरी निवास व भोजनाची व्यवस्थ घेतल्यास ती दिवसांसाठी ८ हजार रुपये शुल्क आकारले जात असून ते अवाजवी असल्याचा आरोप करीत खान्देशातीलच अनेक साहित्यीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार परिसरातील रसिकांसाठी ही रक्कम जास्त आहे. संमेलनाला शासनाचा २ कोटी रुपये निधीसह देणग्या जमा होत असताना आयोजक रसिकांवर अधिक रकमेचा भुर्दंड टाकत असल्याबद्दलही टीका होत असून हे शुल्क कमी करावे, अशी मागणी केली जात आहे.
दोन प्रकारच्या पर्यायी व्यवस्था
दरम्यान, साहित्य संमेलनात केवळ सहभागी होणाऱ्यांसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच उपस्थितांनी स्वत: खर्च केल्यास तेथे सहभागी बचत गटांच्या माध्यमातून स्वस्तात जेवणाची व्यवस्था आहे. मात्र, ज्यांना निवासासह भोजनाची स्वतंत्र व्यवस्था हवी आहे. त्यांच्यासाठी दोन पर्याय आहेत. हॉटेलमध्ये शेअर पध्दतीने राहिल्यास ८ हजार तर संस्थेने केलेल्या महाविद्यालयातील हॉस्टेल, मंगलकार्यालये अश्या ठिकाणी निवास व्यवस्था घेतल्यास प्रति व्यक्ती ४ हजार रुपये आकारण्यात येणार असल्याचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी स्पष्ट केले. हे शुल्क महामंडळाने ठरवून दिलेले असून मागील साहित्य संमेलना इतकेच असल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगीतले. तसेच नोंदणीसाठी काही अडचण असल्यास प्रा. पोपट बऱ्हाटे(9423934797) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.