पोहरा नदी पुन्हा प्रवाहित होणार; तब्बल ८१० कोटींच्या कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सांडपाण्याचे प्रदूषण व अतिक्रमणामुळे खंडित झालेला पोहरा नदीचा प्रवाह पुन्हा एकदा मोकळा होणार आहे. पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अमृत २.० अभियानाअंतर्गत मंजूर केलेल्या ९५७ कोटींच्या प्रकल्पातील ८१० कोटींच्या कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत ही कामे पूर्ण करीत नदीला प्रदूषणमुक्त करून पुन्हा एकदा प्रवाहित करण्यात येणार आहे.

-पश्चिम व दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातून वाहणारी ही नदी नाग नदीप्रमाणेच प्रदूषित झाली आहे. पोहरा नदीतही मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहिन्या सोडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, ठिकठिकाणी अतिक्रमण झाल्याने नदी प्रदूषित होण्याबरोबरच प्रवाहाला अडथळे निर्माण झाले आहेत.

-नदीला प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडून शहरात साउथ सिवरेज झोन व हुडकेश्वर आणि नरसाळा येथे सांडपाणी संकलन प्रणालीचा विकास व प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

-पोहरा नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी या प्रकल्पाची पाच पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी राज्य व केंद्र सरकारकडून प्रत्येकी २५ टक्के तर महापालिकेचा खर्चाचा वाटा ५० टक्के असेल.

-या प्रकल्पांतर्गत लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली या झोनमधील संपूर्ण तर नेहरूनगर झोनच्या काही भागांमध्ये सांडपाणी वाहिनी टाकण्यात येईल. लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली या भागांमधील सांडपाणी वाहिन्यांचे जाळे अत्यंत जुने झाले असल्याने ते बदलण्यात येईल.

-या भागांमधील लोकसंख्या साडेआठ लाखांच्या जवळपास आहे. दररोज या भागातून १५० एमएलडी सांडपाण्याची निर्मिती होते. या भागात तब्बल २५३ किलोमीटरची नवी सांडपाणी वाहिनी टाकण्यात येईल. तर हुडकेश्वर-नरसाळा भागात १६४ किलोमीटर अशी एकूण ४१७ किलोमीटरची नवी सांडपाणी वाहिनी टाकण्यात येईल.

-त्याचबरोबर या प्रकल्पामध्ये चिखली आणि जयताळा येथे दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पदेखील उभारले जाणार आहेत. यातील चिखली येथील प्रकल्पाची क्षमता ३५ एमएलडी तर जयताळा येथील प्रकल्पाची क्षमता १० एमएलडी असेल.
१३ नद्या बनणार ‘अमृत वाहिनी’; विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश, कोणत्या नद्यांचा समावेश?
पाच पॅकेजमध्ये होणार काम

या प्रकल्पाचे काम पाच पॅकेजमध्ये करण्यात येणार आहे. यात पहिल्या पॅकेजमध्ये ४५ दक्षलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राची उभारणी करण्यात येईल. याठिकाणी पम्पिंग स्टेशन, वेट वेल आदींसाठी १०९.२९ कोटी रुपये निधी खर्च करण्यात येईल. तसेच सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सिवरेज सबझोन १ साठी १७५.४० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. तर सबझोन २ व ३करिता २५४.६३ कोटी, पॅकेज चारमध्ये सिवरेज सबझोन चारसाठी ११५.५० कोटी, पॅकेज ५मध्ये हुडकेश्वर व नरसाळासाठी १५५.४६ कोटी असा खर्च अपेक्षित आहे.

Source link

Nagpur newsnagpur riverpohra riverriver pollutionriver sawageअमृत २.० अभियान
Comments (0)
Add Comment