अॅड. रवींद्र पवार आणि अॅड. संजय उडान या दोन आरोपी वकिलांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, नव्याने अटक केलेल्या धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे या दोन आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. आरोपी वकिलांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना व नवीन दोन आरोपींना गुन्हे शाखेने गुरुवारी न्यायालयात हजर केले होते.
‘या खून प्रकरणातील हल्लेखोर आरोपींनी ऑक्टोबरमध्ये शरद मोहोळवर खुनी हल्ल्याचा निष्फळ प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपी साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर व नामदेव महिपती कानगुडे या आरोपींनी दोन्ही आरोपी वकिलांसोबत पिरंगुट परिसरात बैठक घेतली होती. हे आरोपी नेमके कुठे भेटले, त्यांच्यासोबत आणखी कोण होते, याचा शोध घ्यायचा आहे. मोहोळचा खून करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात असताना आरोपी वकील त्यांना भेटले. तिथेच आरोपींनी जुने सीमकार्ड टाकून देऊन नवीन सीमकार्डवरून एका व्यक्तीला फोन केला होता,’ असे गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले. सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपी वकिलांनी पोलिसांना सगळी माहिती दिली असून, त्यांची पोलिस कोठडी वाढविण्याची गरज नाही,’ असा युक्तिवाद आरोपींचे वकील अॅड. सुधीर शहा यांनी केला.
मध्य प्रदेशातून मागवली शस्त्रे
मोहोळ खून खटल्यातील आरोपी धनंजय वटकर आणि सतीश शेडगे यांनी मध्य प्रदेशातून चार शस्त्रे मागवून आरोपींना दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी तीन शस्त्रे जप्त करण्यात आली असून, उर्वरित शस्त्र शोधून, त्याच्या वितरकाचा शोध घ्यायचा आहे, असे तपास अधिकारी सुनील तांबे यांनी न्यायालयाला सांगितले.
आरोपी वकिलांचा बचाव खोडला
मोहोळ खून प्रकरणातील आरोपींना शरण येण्यासाठी मदत करीत असल्याचा आरोपी वकिलांचा दावा तपास अधिकाऱ्यांनी खोडून काढला. ‘मोहोळ खून प्रकरणातील हल्लेखोर आरोपींना शरण यायचे असल्याने आरोपी वकिलांनी सहायक पोलिस निरीक्षक हर्षल कदम यांच्यासोबत संभाषण केले. त्या वेळी त्यांनी आरोपींना नवी मुंबई किंवा कोणत्याही पोलिस ठाण्यात हजर होण्याचा सल्ला दिला होता; तरीही ते विरुद्ध दिशेला का पळाले, कात्रज परिसरात दोन पोलिस चौक्या होत्या, नाकाबंदीही सुरू होती. तिथे सांगून खून प्रकरणातील आरोपींना अटक करता आली असती,’ असे तांबे यांनी न्यायालयात सांगितले.
न्यायालय पक्षकार आणि पोलिसांचेही
शरद मोहोळ खून प्रकरणात दोन आरोपी वकिलांना सुनावणीसाठी हजर केले जाणार असल्याने न्यायालयात वकिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यावर ‘न्यायालय हे वकिलांसोबत पक्षकार आणि पोलिसांचेही आहे, याचे भान सर्वांनी ठेवावे,’ असे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार म्हणाले.