शहराची जीवनवाहिनी असलेल्या जालना रस्त्यानंतर सर्वाधिक रहदारी असलेला रस्ता बीड बाह्यवळण रस्ता ओळखला जातो. बीडहून शहरात न येता बाहेरुन जाण्यासाठी हा रस्ता बनविला गेला. मात्र गेल्या दोन दशकांत रस्त्याच्या उत्तर बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत उभी राहिली. हा भाग महापालिकेत समाविष्ट झाला. त्यामुळे या रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण आवश्यक बनले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प विभागांतर्गत हायब्रीड अॅन्यूटी प्रकल्पांतर्गत २९१ कोटी रुपयांत या कामास मंजुरी मिळाली. तीन उड्डाणपूल, काँक्रिटीकरण, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सेवा रस्ता असे यासह अनेक सुविधा याअंतर्गत पूर्ण करण्यात येत आहेत. रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी सेवारस्तावगळता मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान संग्रामनगर ते बजाज हॉस्पिटल दरम्यान महापालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी सेवा रस्त्याखालून स्थलांतरित करावयाची होती ती करण्यात आली. स्थलांतरित वाहिनीस आता जोडणी द्यावयाची आहे. ही जोडणी दोन ठिकाणी दिल्यानंतर या भागातील सेवा रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामासाठी महापालिकेस पत्रव्यवहार केला आहे. या दोन जोडणी देण्यासाठी पालिकेला ४८ तासांचा शटडाउन घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच हे काम पूर्ण होईल. जर शटडाऊन घ्यायचा तर शहरातील पाण्याचे वेळापत्रक दोन दिवस पुढे जाईल. सध्या पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. त्यात दोन दिवसांची भर पडल्यानंतर पाणीबाणी उद्भवू शकते. त्यासाठी पालिकेचे नियोजन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच या कामाला मुहूर्त लागणार आहे. परिणामी तोवर बीड बायपासचे काम रेंगाळणार आहे. गेली दोन वर्षे रस्तेकामामुळे त्रस्त असलेल्या सातारा, देवळाई, बीडबायपासवासीयांनी हा त्रास आणखी काही दिवस सहन करावा लागणार आहे.
सिग्नल आवश्यक
नव्याने बांधलेल्या बीड बायपासवर विविध चौकांमध्ये सिग्नल बसवावे लागणार आहेत. एमआयटी, गोदावरी टी पॉइंट आणि देवळाई चौकात उड्डाणपूल झाले त्यामुळे तेथे वाहतुकीची अडथळा येणार नाही. मात्र झाल्टा फाटा ते महानुभाव आश्रम चौक या दरम्यान अनेक चौक असे आहेत की जिथे दिवसातून कितीतरी वेळा वाहतूक कोंडी होते. शिवाजीनगर रेल्वे अंडरपासचे काम सुरू आहे. त्यामुळे संग्रामनगर, रेल्वे स्थानक रस्त्यावर गर्दीचे प्रमाण अधिक आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), महापालिका, शहर पोलिस या तीनही यंत्रणांची एकत्रित बैठक घेऊन या रस्त्यावर लवकरात लवकर सिग्नल बसवावे लागणार आहेत. दरम्यान या मार्गावर काही ठिकाणी सर्व्हिस रोडला जाळी लावलेली नाही. जिथे लावली आहे त्यापैकी काही ठिकाणी सोयीसाठी जाळी तोडण्यात आली आहे. रस्ता ओलांडण्यासाठी ठरावीक ठिकाणी गॅप दिले आहेत. वाहतुकीचे नियम तोडून चुकीच्या बाजूने येणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे. ज्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या सर्व गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.
हायमास्ट उजळणार
बीड बायपासवर तीनही उड्डाणपूल, झाल्टा फाटा आणि केंब्रीज चौक या पाच ठिकाणी हायमास्ट लावण्यात येणार आहेत. ज्यामुळे जडवाहतुकीस अधिक दिशादर्शक सहकार्य होण्यास मदत मिळेल, असे या ‘पीडब्लूडी’च्या सूत्रांनी सांगितले.