आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी नवी दिल्लीत विशेष आढावा बैठक आयोजित केली होती. यात प्रत्येक राज्यातील निवडणूक आयोगाच्या कामाचा आढावा घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यात प्रामुख्याने मतदारांची प्रारूप यादी अंतिम करण्याबरोबरच मतदान केंद्रांची माहिती निश्चित करून त्याच्या तयारीवर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून इतर सर्व कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या बैठकीनंतर आता प्रत्येक राज्याच्या कामांबाबत प्रत्यक्ष आढावा घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यात एक पथक पाठवण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने नियोजन आहे. या पथकांत आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुढील आठवड्यात हे पथक दाखल होणार आहे. या दोन दिवसांच्या दौऱ्यात पहिल्या दिवशी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचवेळी विविध प्राधिकरणांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. १७ जानेवारीला राज्य उत्पादन शुल्क, ईडी, एनसीबी यांसारख्या प्राधिकरणांची बैठक घेणार असल्याचे समजते. दुसऱ्या सत्रात राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसह राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकांनंतर राज्यातील निवडणूक आयोगातील उच्च अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फेब्रुवारीपर्यंत कामांची पूर्तता
दिल्लीत शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत राज्यातर्फे तयारीचा तपशील देण्यात आला. यावेळी एक अहवालही सादर करण्यात आल्याचे कळते. या अहवालानुसार राज्यातील निवडणूकपूर्व कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.