राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सिंदखेडराजात जिजाऊसृष्टी परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमातील शिवधर्म पीठावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, चंद्रशेखर शिखरे, शिवमती खेडेकर, गंगाधर बनबरे, अर्जुन तनपुरे, नवनाथ घाडगे, सीमा डोके, विजयकुमार घोगरे, अॅड. मनोज आखरे, मांगीराम चोपडे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
खेडेकर म्हणाले, सिंदखेडराजा विकास आराखड्यासाठी ४५४ कोटी रुपयांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. जिजाऊसृष्टीसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील विकासकामे प्रत्यक्षात यायला हवी. लखुजीराजांच्या समाधीची देखभाल व्हावी, एमएसआरडीसीच्या जागेवर शहाजीराजांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा खेडेकर यांनी व्यक्त केली. निवडणुकीत संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विद्यमान पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह साऱ्यांचेच छत्रपती शिवाजी महाराज महादैवत आहेत. प्रेरणास्रोत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात होते. १२ जानेवारीला विवेकानंद जयंती साजरी करण्यासोबत जिजाऊ जन्मोत्सवात सहभागी झाले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनात वेगळा आदर असल्याचे दिसले असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वच ठिकाणी तिथीचा जप करते. श्रीराम मंदिराचे उद्घाटन मात्र पौष महिन्यात होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मागच्या वर्षी पोलिसांनी जिजाऊभक्तांच्या गाड्या अडविल्या असतानाही एकमेकांच्या मांडीला मांडी लावून, अगदी गर्दीत जिजाऊभक्त या ठिकाणी बसले होते. आज आपण खुर्च्यांची व्यवस्था केली, तरीही त्या रिकाम्या असल्याचा उल्लेख करीत आपल्यावर चिंतनाची वेळ आली असल्याचे खेडेकरांनी नमूद केले.
मानमोडे, शिंदे, कोल्हेंचा गौरव
मराठा सेवा संघाच्यावतीने उद्योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रमोद मानमोडे यांचा ‘मराठा विश्वभूषण पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या श्यामजी शिंदे यांना ‘मराठा क्रीडाभूषण’, तर शिवश्री राजेंद्र कोल्हे यांना ‘मराठा कलारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
मातृतीर्थावर पहाटेपासून गजबज
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त पहाटेपासूनच मातृतीर्थावर गजबज होती. दर्शनासाठी जिजाऊभक्तांच्या रांगा लागल्या होत्या. सूर्योदयी राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजाकडून राजवाड्यात महापूजा झाली. शासकीय पूजादेखील झाली. दुपारनंतर जिजाऊसृष्टी परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवधर्म पद्धतीने विवाह झाले.
जरांगे पाटलांचे जिजाऊंना साकडे
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, असे साकडे त्यांनी जिजाऊंचरणी घातले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईत उपोषण करण्यासाठी जाणार म्हणजे जाणारच, असा ठाम निर्धार त्यांनी बोलून दाखविला. यावेळी उपस्थित जनसमुदायांतून ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देण्यात आल्या.