मुख्यमंत्री दिल्लीची धुणीभांडी करतात, कल्याणमध्ये जात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

स्वप्नील शेजवळ, म.टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. आम्ही त्यांना घरातील एक सदस्य मानत होतो. म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवला, मात्र त्यांना मानपान नको, तर धुणीभांडीच करायची होती. म्हणूनच ते आधी सुरतला व नंतर गुवाहाटीला गेले आणि आता दररोज दिल्लीची धुणीभांडी करत आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

त्यांना धुणीभांडी करू देत. संपूर्ण देशात कल्याण लोकसभा मतदारसंघावर मोठी जबाबदारी आहे. हा मतदारसंघ ही कोणाच्या बापाची मालमत्ता नाही. ती सर्वसामान्य शिवसैनिकांची मालमत्ता आहे. यामुळे गद्दारांना त्यांची जागा दाखवून गाडून टाका, असे आवाहनही त्यांनी केले. शाखा दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे यांनी शनिवारी कल्याण मतदारसंघाचा दौरा केला. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असल्याने ठाकरे यांनी या दौऱ्यात विशेष करून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. यावेळी कार्यकर्त्याचा हुरूप वाढविण्यासाठी ठाकरे यांनी शिंदे यांच्यासह पंतप्रधान मोदी यांच्यावर कडाडून टीका. यावेळी खासदार संजय राऊत, राजन विचारे, संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, युवानेते वरुण सरदेसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का; मिलिंद देवरांनी ‘हात’ सोडला, आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश?

आगामी निवडणुकीत गद्दारांचे डिपॉझिट जप्त करा. शिवरायांच्या पवित्र भूमीत भगव्याला गद्दारीचा कलंक लावणारे पुढच्या पिढीत जन्माला येता कामा नयेत, असा धडा शिकवा व यासाठी आजपासून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आपले हिंदुत्व हे बेगडी नाही. राम मंदिरांसाठी कित्येक कारसेवकांनी आपले रक्त सांडले. मात्र भाजप अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार सोडून दलाली हिंदुत्व घेऊन ढोंगीपणा करत असल्यानेच आम्ही त्यांची साथ सोडली. परंतु कधीही हिंदुत्व सोडले नाही आणि सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राम मंदिराचे लोकार्पण म्हणजे फक्त प्रभूराम आणि सीतेची नव्हे तर देशाच्या अस्मितेची ही प्राणप्रतिष्ठा आहे. ही प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे. मात्र त्यांना राष्ट्रपतींना आमंत्रण द्यावेसे वाटले नाही. म्हणूनच राष्ट्रपतींच्या हस्ते काळाराम मंदिरात तसेच गोदावरी तीरावर २२ जानेवारी रोजी आरती करण्याची आमची इच्छा आहे, असेही ते म्हणाले. शिवजन्मभूमीची मूठभर माती घेऊन मी अयोध्येला गेलो. त्यानंतर वर्षभरात राममंदिराचा निकाल लागला आणि आज मंदिराचे लोकार्पण होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

‘गद्दारांची अनामत रक्कम जप्त व्हावी’

कल्याण लोकसभा मतदारसंघात जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला कार्यकर्त्यंचे भव्य शिबिर होणार आहे. संपूर्ण देशात कल्याण लोकसभा मतदारसंघावर विशेष जबाबदारी असून या निवडणुकीत कल्याण लोकसभेत आपण निष्ठावान उमेदवार निवडून देणार आहोत. एकदा झालेली चूक पुन्हा करणार नाही, गद्दार उमेदवार नसेल मात्र गद्दारांची अनामत रक्कम जप्त करण्यासाठी काम करा, असे आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्याना केले.

इलाका तुम्हारा, धमाका हमारा; श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत

Source link

Eknath Shindekalyan lok sabha constituencyKalyan newsshrikant shindeThane newsUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेकल्याण न्यूजश्रीकांत शिंदे
Comments (0)
Add Comment