९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास लोहा शहरातील विश्रामगृहाजवळ जबरी चोरीची घटना घडली होती. भीमाशंकर पेट्रोल पंपावर दिवस भर जमा झालेले पैसे मालकाला देण्यासाठी एक कर्मचारी मोटरसायकलवर जात होता. विश्रामगृहाजवळ येताच मोटरसायकलवर आलेल्या तिघांनी त्याला अडवले आणि लाथ मारून दुचाकी खाली पाडली. त्यानंतर तलवारीचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्या जवळ असलेले ४ लाख ९१ हजार रुपये हिसकावून पळ काढला. घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी लोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
लोहा पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कसून तपासणी केळी. पृथ्वीराज ठाकूर या कर्मचाऱ्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याने सर्व काही कबूल केलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील इतर आरोपीना देखील अटक केली. शिवाय प्रताप लाड याच्याकडून १ लाख रुपये, विशाल जाधव याच्याकडून ५० हजार रुपये आणि निखिल टेकाळे याच्याकडून ५० हजार रुपये असे एकूण २ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कामगिरीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले.
७० हजार रुपयासाठी कर्मचाऱ्यानेच दिली टीप
दरम्यान, या जबरी प्रकरणात आरोपीनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या पृथ्वीराज ठाकूर याला ७० हजार रुपये देतो, पेट्रोल पंपावरील पैसे घेऊन जाताना माहिती दे असं आमिष दाखवले होते. या अमिषाला बळी पडून त्या कर्मचाऱ्याने आरोपीना टीप दिली. पेट्रोल पंपावरील कर्मचारीच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे.