हायलाइट्स:
- रस्त्याच्या दुर्दशेबाबत नागरिकांकडून नाराजी
- मंत्री जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली
- महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्याची माहिती
सांगली : सांगली ते पेठनाका या मार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे वाढले आहेत. खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक झाल्याने याबाबत सोशल मीडियाद्वारे वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसंच पावसाळ्यानंतर या महामार्गाचे काम होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
सांगली ते पेठ नाका हा जिल्ह्यातील महत्त्वाचा महामार्ग आहे. पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि मालवाहतूक होत असते. आठ-नऊ वर्षांपूर्वी या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले. मात्र कामाचा निकृष्ट दर्जा आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. खड्डे बुजवल्यानंतर चार-सहा महिन्यांनी पुन्हा हा रस्ता खड्डेमय बनतो. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते.
यंदा जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर पुन्हा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. यावर सोशल मीडियातून वाहनधारकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याची दखल घेऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटद्वारे वाहनधारक आणि नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली.
‘पेठ नाका ते सांगली हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारीत आहे. तरीही रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यासाठी मुरूमही उपलब्ध करून दिला आहे. लवकरच खड्डे भरून रस्त्याची दुरुस्ती केली जाईल. पावसाळ्यामुळे सध्या डांबरीकरण करणे शक्य नाही. पावसाळा संपताच रस्त्याचे डांबरीकरण होईल. वाहनधारकांना होणार्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असं ट्वीट जयंत पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, पालकमंत्र्यांच्या दिलगिरीनंतर तरी हा रस्ता खड्डेमुक्त होणार का, हे आता पाहावं लागणार आहे.